कन्हाळगावच्या तीन किमी परिघात ‘इको सेन्सेटिव्ह झोन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2022 10:32 PM2022-11-12T22:32:27+5:302022-11-12T22:33:15+5:30
कन्हाळगाव अभयारण्यात मध्य चांदा प्रादेशिक वन विभागाचे एकूण १८०२.०६५ हेक्टर व वनविकास महामंडळाचे २५१३८.१४६ हेक्टर असे एकंदरीत २६९४०. २११ हेक्टर वनक्षेत्राचा समावेश आहे. इको-सेन्सेटिव्ह झोनची पूर्वतयारी म्हणून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने यासंबंधी हरकती आणि सूचना मागविल्या. वन विभागाने नुकतीच जनसुनावणीही घेतली. एकदा हा सर्व परिसर इको-सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित झाला तर कडक नियम लागू होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्याच्या कन्हाळगाव अभयारण्यामुळे परिसरातील नागरिकांवर आधीच बंधने आली. आता इको सेन्सेटिव्ह झोन क्षेत्रावर अंतिम शिक्कामोर्तब करण्याच्या हालचाली वेगवान झाल्या. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी होऊ शकते. हे क्षेत्र सुमारे तीन किमीच्या परिघात राहणार असल्याने ४० गावांवर यापुढे कडक निर्बंध लागू होऊ शकतात.
कन्हाळगाव अभयारण्यात मध्य चांदा प्रादेशिक वन विभागाचे एकूण १८०२.०६५ हेक्टर व वनविकास महामंडळाचे २५१३८.१४६ हेक्टर असे एकंदरीत २६९४०. २११ हेक्टर वनक्षेत्राचा समावेश आहे. इको-सेन्सेटिव्ह झोनची पूर्वतयारी म्हणून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने यासंबंधी हरकती आणि सूचना मागविल्या. वन विभागाने नुकतीच जनसुनावणीही घेतली. एकदा हा सर्व परिसर इको-सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित झाला तर कडक नियम लागू होणार आहेत. त्यामुळे इको-सेन्सेटिव्ह झोनच्या परिघात सर्व प्रकारच्या कामांना मनाई करण्यात येणार आहे. कृषीपूरक लहान व्यवसायांचीही कोंडी होऊन परिसरातील स्थानिकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार भीती आहे.
या परिसरातील अनेक गावे जंगलावर निर्भर आहेत. त्यांची शेती जंगलाला लागून आहे. त्यामुळे अडचणी वाढण्याची भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
संभाव्य संकटग्रस्त गावे
इटोली- एक-दोन, निमगाटा चेक, मानोरा, निमगाटा मक्ता, कवडजई, केमारा, बहुतरी, देवई, चिंतलधाबा, करंजी, आक्सापूर, चेक बेरडी, चिवंडा, पाचगाव, परसोडी, कुडेसाव, कोठारी, हरणपायली, चक वडेगाव, वडेगाव, टोमटा, सोनापूर (दे.), काटवली, पोडसा, वामनपल्ली, लाठी, वेजगाव, सरांडी, धाबा, वटराना, चेक नांदगाव, चक गोजोली, दुबारपेठ चेक, चेक सोमपल्ली, कोंडाना, मंगलपेठ, गोजोली मक्ता, चक पाचगाव, चक दरूर, धामणगाव, चक तळोधी, भंगारपेठ, भंगाराम तळोधी, चक सुखवासी, डोंगरगाव माल, अडेगाव, कुडे नांदगाव, चेक बापूर, चेक डोंगरगाव.
तेंदूपत्ता संकलन यापुढे कायमचे बंद?
कोठारी, काटवली, बामणी,परसोडी, कुडेसावली, पाचगाव, कन्हारगाव, गणपूर, आक्सापूर, बेरडी, करंजी, भटारी, केमारा व देवई गावातील नागरिकांना दरवर्षी तेंदूपत्ता संकलनाचा मोठा आधार मिळतो. तो आता कायमचा बंद होऊ शकतो. यातून हजारो कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.