७०० सुक्ष्म, लघू उद्योगांचे अर्थचक्र अजूनही रूतलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 09:32 PM2020-10-13T21:32:58+5:302020-10-13T21:33:54+5:30
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊनमुळे अपरिमित हानी झालेली अर्थव्यवस्था आणि बुडालेली उदरनिर्वाहाची साधने पुन्हा पूर्वपदावर येण्यास किमान सहा महिने लागतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. जिल्ह्यात २ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली. कोरोनाची साखळी तोडण्याचे आजही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याचे सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका असंघटीत क्षेत्रातील हजारो कामगारांना बसला होता. रूळावरून घसरलेले अर्थचक्र लवकरच मार्गी लागेल अशी आशा होती. मात्र, दिवाळी तोंडावर असतानाही मंदावलेल्या मागणीमुळे, सुक्ष्म, लघु व बिगर कृषी क्षेत्रातील सुमारे ७०० लघु उद्योग अद्याप सावरलेच नाहीत. पुरेसा रोजगारच मिळत नसल्याने कामगारांनाही उद्याची चिंता सतावू लागली आहे.
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊनमुळे अपरिमित हानी झालेली अर्थव्यवस्था आणि बुडालेली उदरनिर्वाहाची साधने पुन्हा पूर्वपदावर येण्यास किमान सहा महिने लागतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. जिल्ह्यात २ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली. कोरोनाची साखळी तोडण्याचे आजही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याचे सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तुंसह बरेच व्यवसाय सुरू झाले. मात्र, प्रामुख्याने रोजगार पुरविणाऱ्या सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योग व कृषिपूरक तसेच बिगरकृषी सहकारी संस्थांची स्थिती अजुनही पालटली नाही.
कोरोना लॉकडाऊन उठविल्यानंतर बदललेली कामगारांची संख्या, स्वबळावर उद्योग चालविणारे व्यक्ती, कृषी व बिगर संस्थांमध्ये कामगारांची माहिती संकलनाचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले. हा डेटा सुद्धा चिंतेत भरणारी असल्याची माहिती प्रशासकीय वर्तुळातील सूत्राने ह्यलोकमतह्णला दिली.
सुरू झालेले उद्योगही संकटात
लॉकडाऊन आधी जिल्ह्यात सुक्ष्म, लघु, मध्यम व मोठ्या गटातील ३ हजार २०० उद्योग सुरू होते. त्यामध्ये ५६ हजार १२१ कामगारांना रोजगार मिळत होता.
लॉकडाऊन हटविल्यानंतर २ हजार ५३० उद्योग सुरू झाले. यामध्ये ४५ हजार ४१२ कामगारांना रोजगार मिळाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला होता.
परंतु, कच्च्या मालाची आवक व उत्पादीत मालाची मागणी यातील अंतर दूर झाले नाही. त्यामुळे कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात कमी करणे सुरू झाले आहे.
म्हणे फक्त १४ हजार बेरोजगार!
जिल्ह्यातील राईसमील, चंद्रपूर औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील रासायनिक, स्पंज आर्यन, सिमेंट, वाहने व विविध उद्योगांना लागणारे सुटे भाग, तेल गिरण्या, कृषी क्षेत्रातील निगडीत अवजारे व औष्णिक केंद्रासाठी आवश्यक तांत्रिक साधनांचे उत्पादन सुरू आहे. मात्र, मागणीअभावी या उद्योगांनीही कामगार कमी केले. उद्योग विभागाच्या माहितीनुसार १४ हजार व्यक्ती बेरोजगार झाल्याची नोंद आहे. परंतु, प्रत्यक्षात ही संख्या धक्कादायक असण्याची शक्यता आहे.