कोरोनामुळे डबघाईस आलेले अर्थचक्र पुन्हा रूळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2021 05:00 AM2021-11-06T05:00:00+5:302021-11-06T05:00:47+5:30

दिवाळीच्या खरेदीसाठी बुधवारी व गुरूवारी चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठात मोठी गर्दी उसळली होती. आकाशदिवे, पणत्या, लायटिंग, लक्ष्मीपूजनासाठी देवीच्या मूर्ती व साहित्यासह कपडे खरेदीसाठी चंद्रपुरातील गोलबाजारातील दुकानांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याचे शुक्रवारी दृश्य दिसून आले. स्टील भांड्यापासून तर विविध प्रकारांतील कापड व जीवनावश्यक वस्तुंची जोरात विक्री होत आहे. कोनेरी तलावातील फटाका दुकानातही कोट्यवधींची उलाढाल झाली.

The economic cycle that was ruined due to corona is back on track! | कोरोनामुळे डबघाईस आलेले अर्थचक्र पुन्हा रूळावर !

कोरोनामुळे डबघाईस आलेले अर्थचक्र पुन्हा रूळावर !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे दोन वर्षांपासून डबघाईस आलेली अर्थव्यवस्था दिवाळीपासून पुन्हा रूळावर येत असल्याचे बाजारपेठातील गर्दीवरून दिसून येत आहे. लॉकडाऊनचा फटका बसलेली बाजारपेठ १०० टक्के पूर्वपदावर येण्यास कालावधी लागेल. मात्र, आर्थिक उलाढालीची गती अशीच वाढत राहिल्यास बाजारपेठाला लवकरच चांगले दिवस येण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तविली आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी बुधवारी व गुरूवारी चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठात मोठी गर्दी उसळली होती. आकाशदिवे, पणत्या, लायटिंग, लक्ष्मीपूजनासाठी देवीच्या मूर्ती व साहित्यासह कपडे खरेदीसाठी चंद्रपुरातील गोलबाजारातील दुकानांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याचे शुक्रवारी दृश्य दिसून आले. स्टील भांड्यापासून तर विविध प्रकारांतील कापड व जीवनावश्यक वस्तुंची जोरात विक्री होत आहे. 
कोनेरी तलावातील फटाका दुकानातही कोट्यवधींची उलाढाल झाली. आकाशदिवे तसेच इलेक्ट्रानिक्स वस्तुंची मागणी आहे, अशी माहिती व्यावसायिक नीरज देशकर यांनी दिली. कोरोनामुळे दर वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, कोरोना ओसरल्याचे पाहून थोक व्यापाऱ्यांनी माल स्टॉक केल्याने किंमतीत मोठी वाढ करण्यात आली नाही. दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झाली. त्यामुळे मार्केटमध्ये तेजी येत असून व्यवसायही चांगला होऊ शकतो, असा आशावाद चंद्रपुरातील व्यापारी धीरेन मेहता यांनी व्यक्त केला आहे.

कापड बाजारात बंपर खरेदी
कोरोना काळातील नुकसान भरुन काढता येईल, या हेतूने दुकानदारांकडून प्रयत्न केल्या जात आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यासाठी कापड व रेडिमेड विक्री करणाऱ्यांनी सवलती जाहीर केल्या. खास दिवाळीसाठी सुमारे २० ते ३० टक्के सुट जाहीर केल्याने नोकरदार, मध्यमवर्ग व सर्वसामान्य नागरिकही बंपर खरेदी करीत आहेत. सध्या तरी चंद्रपूरसह जिल्ह्यातील बाजारपेठात रेलचेल दिसून येत आहे.

 आठवडी बाजारातही धुम
लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांसोबत सर्वांचेच माेठे नुकसान झाले. अनेकांचा रोजगार बुडाला. लहान व्यवसाय करणारे संकटात सापडले होते. आठवडी बाजारात व्यवसाय करणाऱ्यांनी नाईलाजास्तव हंगामी व्यवसाय सुरू केला. यात उत्पन्नाची हमी नसल्याने कुटुंब चालविणे कठीण झाले होते. दिवाळीने चित्र बदलले. आधीचे सर्वच लहान व्यवसाय सुरू झाल्याने मोठा आधार मिळाला आहे. बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, ब्रह्मपुरी, मूल, नागभीड, सिंदेवाही, राजुरा, घुग्घुस, सावली व गोंडपिपरी बाजारातही खरेदीची धुम सुरू आहे

सराफा बाजाराला  यंदा झळाळी
- दिवाळीसाठी सोने खरेदी करणाऱ्यांची संख्याही बरीच दिसून आली. या खरेदीमुळे चंद्रपुरातील सराफा बाजाराला झळाळी आली. नविन कायद्यानुसार ग्राहक तीन श्रेणीतील दागिने खरेदी करू शकतात. यात १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याचा समावेश आहे. हा नियम चांदीच्या दागिन्यांसाठी नाही. मेडिकल, दातांच्या कामासाठी २ ग्राम सोन्याच्या दागिन्यांवर हाॅलमार्कचा नियम लागू होत नाही. सोनाराने आपल्या ग्राहकाला सोने खरेदी करताना हाॅलमार्कविषयी माहिती देत असल्याचे यंदा प्रथमच पाहायला मिळाले

 

Web Title: The economic cycle that was ruined due to corona is back on track!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.