संस्कृतीसोबतच आर्थिक सुबत्ता आणा
By admin | Published: December 27, 2014 01:20 AM2014-12-27T01:20:40+5:302014-12-27T01:20:40+5:30
येथे राजे खांडक्या बल्लारशाह राजाच्या समाधी परिसरात सुरु असलेल्या गोंड महासभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भरगच्च कार्यक्रम झाले.
बल्लारपूर : येथे राजे खांडक्या बल्लारशाह राजाच्या समाधी परिसरात सुरु असलेल्या गोंड महासभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भरगच्च कार्यक्रम झाले. विचारमंथन आणि परंपरागत रेला नृत्याने उपस्थितांचे मने जिंकली.
गोंड समाजाच्या विविध समस्यांवर उपस्थितांनी प्रकाश टाकला. यात समाजाची होणारी पिळवणूक, आर्थिक मागासलेपणा याबाबतच चिंता व्यक्त करण्यात आली. हे दूर करायचे असल्यास आपली संस्कृती जपा, सोबतच आर्थिक सुबत्ता कशी येईल, याचा प्रयत्न करा, या मार्गाने जा असे मार्गदर्शन करण्यात आले.
गोंडवाना गोंड पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा हिरासिंग मरकाम हे साहित्यावर भरभरून बोलले. सोबतच चुकीची माहिती देणाऱ्या साहित्यापासून आणि वक्त्यांपासून दूर राहावे, असा सल्लाही दिला. मरकान यांनी गोंडी इतिहास सांगत, आम्हाला मोठी परंपरा आहे. असे अभिमानाने सांगितले.
गोंड समाजात स्त्रीचे महत्त्व याबाबत दुर्गावती पदमानकर, वेदमती मडावी यांनी विचार मांडले. गोंड शासकांनी प्रजाहितासोबतच त्यांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले असते तर आज गोंडी समाज पुढारलेला राहिला असता, अशी खंत व्यक्त करून युवकांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यातून प्रगती करून ही उणीव भरून काढावी, असा हितोपदेश वक्त्यांनी दिली. गोंडी लिपी व या भाषेला महत्त्व देऊन या भाषेचे जतन शासकीय स्तरावरून करण्यात यावे, अशीही मागणी काही वक्त्यांनी केली. आजच्या सभेत मोतीरावन कंगाली, खा. फग्गनसिह कुलस्ते, धर्मगुरु शेरसिग आचला, कुसूम आलाम, राजे विरेंद्रशहा आत्राम, दुर्गावती उईके, के.पी. प्रधान, के.पी.शहा, वासूदेव टेकाम, माजी आमदार नामदेव उसेंडी आदींनी विचार मांडले.
बल्लारपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे समाजबांधवांनी गोंड संघटनेचे केंद्रस्थान बनवावे, असे विचार मांडण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)