खाद्यतेलाचे दर भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:29 AM2021-04-09T04:29:46+5:302021-04-09T04:29:46+5:30
बल्लारपूर : गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ते आता प्रतिलिटर १२० ते १७० ...
बल्लारपूर : गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ते आता प्रतिलिटर १२० ते १७० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या घरखर्चात वाढ होऊन त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत खाद्यतेलाच्या दरामध्ये प्रतिलिटर ५० ते ७० रुपये दरवाढ झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेल दर वाढले असताना खाद्यतेल यांच्या दरात वाढ झाली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अचानक खाद्यतेलाची मागणी वाढली आणि मागणी वाढली की साहजिक दरात वाढ व्हायला सुरवात झाली आणि ते सातत्याने कमी जास्त प्रमाणात वाढतच आहे. यावर्षी खाद्यतेलाच्या दरात नवा उच्चांक गाठला असून, एकाच वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाच्या दरात कधीच वाढ झाली नव्हती. असे व्यापाऱ्यांचे व गृहणींचेदेखील म्हणणे आहे. सोयाबीन तेल सध्या १२० ते १३० रुपये प्रति लिटरमध्ये असून, गतवर्षी ते ६० ते ८० रुपयांच्या दरम्यान होते. पामतेल आता १२० रुपये प्रति लिटर असून, गतवर्षी ते ८० ते ८५ या दरात होते. शेंगदाणा तेल १६० ते १७० रुपये लिटरपर्यंत पोहोचले असून, गतवर्षी ते १०० ते ११०च्या दरम्यान होते. एकंदरीत वाढलेल्या खाद्यतेलाच्या किमतीमुळे गृहिणीच्या घर खर्चात निश्चितच वाढ झाली आहे.