कोळसा खाणीसाठी संपादित जमिनीला सुधारित दराने मोबदला मिळणार
By admin | Published: July 10, 2014 11:30 PM2014-07-10T23:30:39+5:302014-07-10T23:30:39+5:30
राजुरा तालुक्यातील सास्ती, गोवरी परिसरात वेकोलिने अधिग्रहित केलेल्या ३०.९.२०११ पर्यंत अंतिम अधिसूचना झालेल्या १३३ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराप्रमाणे मोबदला मिळण्याचा मार्ग
राजुरा : राजुरा तालुक्यातील सास्ती, गोवरी परिसरात वेकोलिने अधिग्रहित केलेल्या ३०.९.२०११ पर्यंत अंतिम अधिसूचना झालेल्या १३३ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराप्रमाणे मोबदला मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या २२ आॅगस्ट २०१२ च्या शासन निर्णयानुसार सुधारित दराप्रमाणे मोबदला मिळण्याचा हा मार्ग राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकाराने मोकळा झाला आहे.
परिसरातील जवळपास १३३ शेतकऱ्यांना या निर्णयामुळे फाभ होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सास्ती, गोवरी, पोवनी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोळसा खाणीसाठी सुधारित दराने मोबदला मिळावा, यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी २०१२ पासून शासनाकडे पाठपुरावा चालविला होता. अलिकडेच प्रधान सचिव (वने) प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात ७ जुलैला बैठक पार पडली. यात आ. सुभाष धोटे यांच्यासह भूसंपादन अधिकारी तथा गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आ. धोटे यांनी शेतकऱ्यांची बाजू परदेशी यांना पटवून दिली.
विषयाची गंभीरता लक्षात घेऊन प्रविण परदेशी यांनी जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर आणि वेकोलि नागपूर मुख्य महाप्रबंधक कार्यालयातील निर्देशक (तांत्रिक) ओमप्रकाश यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसच्या माध्यमातून चर्चा केली. उपसचिव भूसंपादन महसूल व वनविभाग यांच्याशीही या बैठकीत चर्चा होऊन मुद्दा निकाली काढण्यात आला. ३० सप्टेंबर २०११ ला निर्गमित झालेल्या अंतिम अधिसूचनेचा आधार घेऊन १३३ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना २२ आॅगस्ट २०१२ च्या नवीन कायद्यानुसार नवीन सुधारित दराने मोबदला देण्याचे निर्देश वेकोलि अधिकाऱ्यांना देण्यात आले. वेकोलिने वाढीव दरासंदर्भात सहमती दर्शविली आहे. मुंबईतील बैठकीत सास्ती येथील शेतकरी वसंत चन्ने, सुरेश लांडे, राजेश्वर लांडे, बळीराम लांडे, बाळू रोगे, निखील सालवटकर, पुरुषोत्तम शेंडे, सुरेश लांडे, रमेश लांडे आदी उपस्थित होते.