वसतिगृहातील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा
By admin | Published: July 12, 2015 01:22 AM2015-07-12T01:22:42+5:302015-07-12T01:22:42+5:30
वसतिगृहात राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला येथील सत्र न्यायाधिश के.के. गौर यांनी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
एक हजाराचा दंड : १० वर्षे सश्रम कारावास
चंद्रपूर : वसतिगृहात राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला येथील सत्र न्यायाधिश के.के. गौर यांनी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
नगाजी पुंडलिक जांभुळकर असे आरोपीचे नाव असून ही घटना ब्रह्मपुरी येथील मायादेवी वसतीगृहात घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी वसतिगृहातील खोलीत झोपून असताना नगाजी जांभुळकर याने तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या तोंडी तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलिसांनी आरोपी नगाजी जांभुळकर याच्याविरुद्ध भादंवि ३७६ (आय), ३५४ (अ) (क), सहकलम ३ (ब), ७ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास ब्रह्मपुरीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सोनकुसरे यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने साक्षिदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे येथील सत्र न्यायाधिश के.के. गौर यांनी आरोपी नगाजी जांभुळकर याला १० वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारतर्फे अॅड.संजय मुनघाटे यांनी युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी म्हणून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील जमादार राजू सबळ यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)