आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पुण्यात शिक्षण
By admin | Published: June 5, 2016 12:44 AM2016-06-05T00:44:12+5:302016-06-05T00:44:12+5:30
गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
भारतीय जैन संघटनेचा उपक्रम : पाचवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना लाभ
चंद्रपूर : गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दरवर्षी आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. ही सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यानुषंगाने भारतीय जैन संघटनेतर्फे शेतकरी आत्महत्याग्रस्त मुला-मुलींना पुणे येथे ५ ते १२ वीपर्यंत मोफत शिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
भारतीय जैन संघटनेने मागील वर्षी संपूर्ण मराठवाड्यातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ३०० मुला-मुलींना इयत्ता ५ ते १२ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी पुणे येथे आणले. येत्या शैक्षणिक वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातून १ जानेवारी २०१५ नंतर आत्महत्या केलेल्या ३,३०० शेतकरी कुटुंबांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी पुणे येथे आणण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. बीजेएसचे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते त्या-त्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारामध्ये भेट देऊन त्यांच्या मुला-मुलींना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याची तयारी करून १३ जून रोजी आपआपल्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून रवाना करतील.
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत चंद्रपुरात ८६ तर गडचिरोली येथे ५ अशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले आहेत. १ जानेवारी २०१५ ते ३० एप्रिल २०१६ पर्यंत केंद्रीय नियोजन लोकांची समिती या समितीमध्ये चंद्रपुरातील व गडचिरोलीचे समन्वयक अशोक संघवी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समन्वयक समिती बनविली आहेत. त्यासाठी येथील दीपक पारख, महेंद्र मंडलेचा, रोहीत पुगलिया, जितेंद्र पाटनी, भूपेंद्र कोचर, तरूण बैद, अभिषेक कास्टीया या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १३ जूनला जैन भवन येथून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पुणे येथे शिक्षणासाठी रवाना करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून याच दिवशी सर्व मुलांना पुणे येथे आणण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यात शासकीय सहकार्य लाभणार आहे.
सन २०१५ मध्ये आपल्या जिल्ह्यातील विविध गावात घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनामधील कुटुंबामध्ये अजून इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेली मुले आहेत का व त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेता येईल का, याची पाहणी प्रत्येक तालुक्यातील गावात जाऊन करण्यात येत आहे. यामध्ये आढळलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना त्याच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी सन २०१६-१७ या वर्षापासून संस्थेच्या वसतिगृहात आणि शाळेत मोफत प्रवेश देण्याचा मानस आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक प्रश्नांपेक्षासुद्धा मानसिक, शारीरिक व शैक्षणिक प्रश्न महत्त्वाचे ठरले आहेत. त्याच्या डोळ्यासमोर झालेल्या वडिलांच्या आत्महत्येचे दृश्य आयुष्यभर त्यांच्या समोर उभे राहणार आहे. त्यातून सावरून या मुलांना शिक्षण देऊन तयार करणे हे एक मोठे आव्हान आहे व बीजीएसने ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मेंटल हेल्थ या वेगळ्या विभागाची स्थापना केली. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
जास्तीत जास्त संख्येने मुला-मुलींना शिक्षणासाठी पुणे येथे पाठविण्याचे आवाहन ंसंस्थेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी केले आहे. (प्रतिनिधी)