शिक्षण विभागही घेणार पालक हिरावलेल्या बालकांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:19 AM2021-06-10T04:19:50+5:302021-06-10T04:19:50+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येसोबतच मृत्युदर मोठ्या प्रमाणात वाढला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. शेकडो बालकांच्या डोक्यावरील छत्र हरपले ...
चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येसोबतच मृत्युदर मोठ्या प्रमाणात वाढला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. शेकडो बालकांच्या डोक्यावरील छत्र हरपले आहे. जिल्हा प्रशासन या बालकांचा शोध घेत त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, कोणत्याही बालकांवर अन्याय होऊ नये, शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, त्यांची सुरक्षा व्हावी यासाठी आता शिक्षण विभागही शाळानिहाय अशा बालकांचा शोध घेणार आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून अशा बालकांची माहिती तत्काळ देण्याचे कळविले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत ८३ हजार ८७७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर ८१ हजार११९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, १ हजार ४८८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडली. त्यामध्ये शेकडो बालकांचे आई-वडील यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर काही बालकांचे आई आणि वडील या दोघांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा बालकांची वाताहत होऊ नये यासाठी प्रशासनाने या बालकांची माहिती काढणे सुरू केले आहे. सद्य:स्थितीत ११८ बालकांची प्रशासनाला माहिती कळली आहे. मात्र, आणखीही बालक असल्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे आता शिक्षण विभागाने शाळानिहाय बालकांची नावे गोळा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांचा शोध घेणे प्रशासनाला आणखीच सोपे जाणार आहे.
बाॅक्स
येथे करा संपर्क
कोरोना संकटामध्ये आई-वडील यापैकी दोघेही किंवा दोघांपैकी एकाला ज्या बालकांनी गमावले आहे. अशा बालकांची माहिती प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. परिसरात असे बालके आढळल्यास या बालकांची माहिती टोल क्रमांक १०९८ वर द्यावी. जेणेकरून या बालकांना शासनाची मदत मिळणे सोपे जाईल तसेच त्याचा गैरवापर टळेल.