शिक्षणमंत्र्यांचे शिक्षक भरतीचे आश्वासन फोल; आमदार सुधाकर अडबाले यांचा आरोप
By साईनाथ कुचनकार | Published: August 25, 2023 08:04 PM2023-08-25T20:04:57+5:302023-08-25T20:05:05+5:30
पवित्र पोर्टल सुरू न झाल्याने टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये संताप
चंद्रपूर : राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. १५ ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, २४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात पवित्र पोर्टल सुरूच करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली नाही. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात दिलेले आश्वासन फोल ठरले, असा आरोप शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केला आहे.
राज्यात शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पदे शासन भरत नसल्याने रिक्त जागांचा आकडा दरवर्षी वाढत आहे. काही जागा समायोजन प्रक्रियेने भरण्यात येत असल्या तरी रिक्त जागांचा अनुशेष भरून निघत नसल्याने याचा विपरीत परिणाम या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. उच्च श्रेणी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्या पदोन्नतीचे पद व विस्तार अधिकारी व सहायक शिक्षकांची पदे कधी भरणार? व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याबाबत ७ जुलै २०२३ रोजी काढलेले परिपत्रक रद्द करावे, असा प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
पवित्र पोर्टल झाले अपवित्र
राज्याच्या शिक्षण विभागाला पवित्र पोर्टल सुरू करण्यात अपयश आले आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शिक्षक भरती सुरू होईल, अशी त्यांना आशा होती. परंतु, पवित्र पोर्टल अपवित्र झाल्याचे दिसत आहे. राज्य शासनाने तातडीने पवित्र पोर्टल सुरू करावे -सुधाकर अडबाले, शिक्षक, आमदार