मुख्याध्यापकाच्या प्रतीक्षेत शिक्षणाधिकारी तासभर बसले शाळेच्या पायरीवर
By admin | Published: May 23, 2014 11:46 PM2014-05-23T23:46:16+5:302014-05-23T23:46:16+5:30
आरटीइ अॅक्ट-२००९ च्या तरतुदींचे कसलेही पालन न केल्याने आधीच अपात्रतेच्या यादीत आलेल्या चंद्रपुरातील एस.डी. म्हस्के हायस्कूलमध्ये तपासणीसाठी गेलेल्या शिक्षणाधिकार्यांच्या पथकाला
चंद्रपूर : आरटीइ अॅक्ट-२००९ च्या तरतुदींचे कसलेही पालन न केल्याने आधीच अपात्रतेच्या यादीत आलेल्या चंद्रपुरातील एस.डी. म्हस्के हायस्कूलमध्ये तपासणीसाठी गेलेल्या शिक्षणाधिकार्यांच्या पथकाला आज शुक्रवारी धक्कादायक अनुभव आला. आदल्या दिवशी सूचना देवूनही कुणीही शाळेत उपस्थित नव्हते. मुख्याध्यापकांनी मोबाईल स्विच आॅफ करून ठेवला होता, तर आता पोहोचतोच आहे, असे सांगत काही वेळाने शाळेच्या सचिवांनीही मोबाईल स्विच आॅफ केला. अखेर कुलूपबंद शाळेच्या पायरीवर तासभर प्रतीक्षा करुनही शिक्षणाधिकारी आणि त्यांच्यासोबत आलेल्या पथकाला बाहेरून आढावा घेवूनच परतावे लागले. चंद्रपुरातील एस.डी. म्हस्के हायस्कूलमध्ये आरटीइ अॅक्टनुसार तरतुदींचे पालन होत नसल्याचे ६ मार्चच्या पहाणीत आढळून आले होते. त्याचा अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे पाठविल्यावर शाळेचे मुध्याध्यापक आणि संस्था सचिवांची सुनावणी झाली होती. संस्थासचिवांनी मुख्याध्यापकाकडून नियमबाह्य रक्कम कपात करणे, शाळा संहिता नियम ३.२ नुसार पूर्तता न करणे, आरटीइ अॅक्टनुसार कार्यवाही न करणे, संस्थेने विश्वासार्हता गमावणे, शिक्षणाधिकार्यांकडून मान्यता रद्द करण्यासाठी शिफारस येणे आदी मुद्यांंवर चर्चा झाली होती. या सुनावणीनंतर शिक्षण उपसंचालकांच्या १२ मे च्या पत्रावरून आज शुक्रवारी हे पथक अंतीम पहाणीसाठी शाळेत आले होते. त्यात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देशपांडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक गुढे) आणि अन्य सदस्यांचा समावेश होता. सकाळी ८ वाजता हे पथक येणार असल्याची सूचनाही आदल्या दिवशी मुख्याध्यापक आणि संस्थासचिवांना दिली होती. मात्र त्याकडे साफ पाठ फिरवून या दोघांनीही शाळेत येण्याचे टाळले. पथक पोहोचले तेव्हा केवळ शाळेतील एक शिपाई हजर होता. मात्र त्याच्याकडे शाळेच्या किल्ल्या नव्हत्या. शाळेतील लिपिकापासून तर मुख्याध्यापक, संस्थासचिव या सर्वांना मोबाईलवरून संपर्क साधून झाला. पण कुणीही फिकले नाही. सुरूवातीला संस्थासचिवांचा मोबाईल सुरू होता. मात्र नंतर तोसुद्धा स्विच आॅफ झाला. अखेर दिड तास वाट पाहून या पथकाने शाळेच्या पायरीपर बसूनच आपला अभिप्रय तयार केला. त्यात शाळेतील पहाणीत आढळलेल्या त्रुट्यांचा उल्लेख करुन शाळा मान्यता काढण्याचा अभिप्राय नमुद करुन हे पथक परतले. (जिल्हा प्रतिनिधी)