विद्यार्थ्यांच्या गावात शिक्षण आपल्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:25 AM2021-07-26T04:25:55+5:302021-07-26T04:25:55+5:30
रमाबाई आंबेडकर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम उदय गडकरी सावली : कोरोना महामारीने संपूर्ण जग थांबले असताना ग्रामीण विद्यार्थी ज्ञानार्जनात मागे ...
रमाबाई आंबेडकर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
उदय गडकरी
सावली : कोरोना महामारीने संपूर्ण जग थांबले असताना ग्रामीण विद्यार्थी ज्ञानार्जनात मागे राहू नयेत, या उदात्त हेतूने सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या अध्यापकांनी विद्यालयाचे विद्यार्थी असलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन ‘शिक्षण आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे.
या स्तुत्य उपक्रमाचे सर्व पालकांनी स्वागत केले आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीने सर्वत्र लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर होत असल्याने विद्यार्थ्यांचे पालक व अध्यापकही चिंताग्रस्त झाले. त्या अनुषंगाने रमाबाई आंबेडकर विद्यालय, सावलीच्या अध्यापकांनी एकमुखी निर्णय घेऊन ज्या गावांमध्ये विद्यालयाचे विद्यार्थी आहेत, त्या गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिकविण्याचा उपक्रम हाती घेतला. मोखाळा, कढोली, हरांबा, साखरी, लोंढोली, उसेगाव, सिंदोळा, भट्टीजांब, मालपिरंजी, भारपायली यासारख्या ठिकाणी जाऊन आठ- दहा विद्यार्थ्यांना एकत्र करून ज्ञानार्जनाचे कार्य ५ जुलैपासून सुरू केले. मागील वर्षी विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न या ‘शिक्षण आपल्या दारी’ उपक्रमाने सुरू आहे.
बॉक्स
ऑनलाइन शिक्षणापासून
विद्यार्थी होते वंचित
ऑनलाइन वर्ग सुरू करण्याच्या सूचना सर्व विद्यालयांना दिल्या असल्या तरी ग्रामीण भागातील, तसेच गरीब विद्यार्थी या सुविधेपासून वंचित होते. त्यामुळे ते शैक्षणिक प्रवाहातून मागे राहिले. या बाबींचा गंभीरपणे विचार करून रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.एल. शेंडे यांनी सहअध्यापकांना प्रवृत्त केले. स्वयंप्रेरणेने चालवीत असलेल्या या उपक्रमामुळे मागील दीड वर्षापासून शैक्षणिक प्रवाहापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रवाहात आणता येईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
कोट
श्रीमंत पालकांनी आपल्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून त्यांचे शैक्षणिक वातावरण कायम ठेवले. मात्र, गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय दिसत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे केवळ वेतन भोगी न राहता समाजाचे आम्ही काही देणे लागतो म्हणून आमच्या विद्यालयाने ‘शिक्षण आपल्या दारी’ हा उपक्रम स्वयंप्रेरणेने राबविण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला पालक व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
-चंदा रायपुरे (गेडाम), अध्यापक, रमाबाई आंबेडकर विद्यालय, सावली