निधीअभावी रखडली रोहयोची कुशल कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2017 12:39 AM2017-03-05T00:39:36+5:302017-03-05T00:39:36+5:30
बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली.
कामे प्रलंबित : जिल्ह्यासाठी अडीच कोटींची गरज
परिमल डोहणे चंद्रपूर
चंद्रपूर : बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. त्यानूसार नरेगातर्फे कुशल व अकुशल अशा दोन प्रकारची कामे करण्यात येतात. मात्र शासनाकडे कुशल निधी उपलब्ध नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वैयक्तिक लाभाची अनेक कामे प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण राज्यभरातच २ नव्हेंबरपासून कुशल कामे बंद आहेत. ही कामे सुरु करण्यासाठी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोन कोटी ४३ लाख रुपये कुशल निधीची गरज आहे.
दुष्काळातील मनुष्यबळ हाताळणीची एक उपाययोजना म्हणून महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली. त्यामध्ये तेंडुलकर समितीने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकुण २७७ लाख गरीब ग्रामीण लोकांना रोजगार देण्याचा मुख्य उद्देश ठेऊन रोजगार हमी योजनेला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार मागेल त्याला रोजगार या ाधारे जाबकार्डधारकांना रोहयोची कामे देण्यात येतात.
ज्यावेळी मजुरांकडून कामाची मागणी केली जाते. त्यावेळी साधारणत: रोहयोची कामे सुरु केली जातात. जर मजुरांंना रोजगार उपलब्ध झाला नाही तर मजुरांना रोजगार भत्ता द्यावा लागतो. मात्र यावर्षी जशी कामाची मागणी झाली, तसेच कामे देण्यात आली.
नरेगातर्फे ६० टक्के अकुशल कामे केली जातात. तर ४० टक्के ही कुशल कामे केली जात असतात. त्यामध्ये कुशल कामामध्ये वैयक्तिक लाभाची कामे अधिक प्रमाणात केली जातात. त्यामध्ये शौचालय, नाळे कंपोष्ट टाके, शौषखड्डे, सिंचन विहिरी, रस्ता बांधकाम, गुरांचा गोठा आदी कामे केली जातात. सन २०१६- २०१७ या वर्षात अनेक ग्रामपंचायतींनी ही कामे कुशल निधीद्वारे केली. मात्र निधीअभावी साहित्य खरेदीवर परिणाम पडला. त्यामुळे ही कामे अर्धवट राहिली. त्यामुळे यावर्षीच्या नवीन कामावर याचा विपरित परिणाम पडत आहे.
कुशल निधीअभावी वैयक्तिक कामांवर परिणाम झालेला आहे. सदर कुशल निधीच्या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे व शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. लवकर निधीची पूर्तता करण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले आहे.
-संजय बोदले,
उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक, चंद्रपूर