ऐंशी टक्के पीक मातीत गेलं; कागदावर लिहिलं २९ टक्के
By साईनाथ कुचनकार | Published: February 22, 2024 04:33 PM2024-02-22T16:33:40+5:302024-02-22T16:35:01+5:30
अन्नदाता एकता मंच, पीक विम्याची रक्कम आता तरी द्या हो.
साईनाथ कुचनकार,चंद्रपूर : जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला. पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, मात्र नियमानुसार नुकसान भरपाई न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विमा कंपनीबाबत संताप व्यक्त केला जात आहे. अशात ८० टक्के नुकसान झाले असतानाही कागदोपत्री केवळ २९.५६ टक्केच दाखविल्याचा आरोप करत अन्नदाता एकता मंचने पीक विमा द्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
यासंदर्भात अन्नदाता एकता मंचने जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. ८० टक्के नुकसान झालेले असताना सुद्धा विमा कंपनीकडून २९.५६ टक्के दाखवण्यात आले आहे. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून नियमानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलन तथा उपोषण करण्याचा इशारा अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप कुटेमाटे, अनुप कुटेमाटे, मोहन दर्वे, विनोद ठोंबरे, सुनील मोरे, अमोल क्षीरसागर, सुनीता दर्वे, कविता कुटेमाटे, रत्नमाला आस्कर, वंदना आसुटकर, भास्कर कुटेमाटे, योगेश मत्ते, अक्षय कुटेमाटे, योगेश कुटेमाटे, भोजराज डाखरे, हेमंत बोबडे आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.
घेराव घातल्यानंतर मिळाली होती रक्कम :
सन २०२२ मध्ये विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा देण्यास टाळाटाळ केली होती. नुकसानीचे प्रमाण अधिक असतानाही कमी नुकसान दाखवून शेतकऱ्यांचे नुकसान केले होते. यासंदर्भात पिपरी देशमुख येथील शेतकऱ्यांनी विशेषत: महिला शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला घेराव घातला होतात. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आल्याची आठवणही शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना करून दिली.