आठ महिन्यांत सव्वा कोटींची दारु जप्त
By admin | Published: March 29, 2017 01:59 AM2017-03-29T01:59:06+5:302017-03-29T01:59:06+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी केल्यामुळे तळीराम शौक पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान करताना दिसत आहेत.
चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी केल्यामुळे तळीराम शौक पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान करताना दिसत आहेत. अवैध दारु विक्रीवर पोलिसांची करडी नजर असल्यामुळे दारू विक्रेतेही चांगलेच धास्तावले आहे. चिमूर पोलिसांनी अवघ्या आठ महिन्यात एक कोटी २२ लाख ३१ हजार ८६५ रुपयांच्या अवैध दारुसह मुद्देमाल जप्त केला आहे.
चिमूर पोलीस स्टेशनमध्ये मागील काही वर्षापासून कोणताही ठाणेदार आपला कार्यकाळ पूर्ण करीत नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळे अधिकारी चिमूरला येण्यास इच्छुक नसल्याचे विभागाकडूनच सांगण्यात येते. मात्र मागील वर्षाच्या जून महिन्यात चिमूर ठाण्याचा पदभार पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी ठाणेदार दिनेश लबडे यांच्याकडे सोपविला. ठाणेदार म्हणून पदभार स्विकारतानाच ठाणेदारांनी क्रांती नगरी चिमुरातील शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेत आपल्या कार्यास सुरुवात केली. मात्र ठाणेदारांनी शहराची शांतात भंग होण्याचे कारण अवैध दारू विक्री असल्याचे हेरुन अवैध दारुविरुद्ध मोहिम हाती घेतली. यात त्यांना चांगलेच यश आले आहे.
पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या खून, चोरी, तंटे यासह अवैध दारुच्या गुन्ह्याचा छडा लावला. त्यामध्ये चिमूर पोलिसांनी अवघ्या आठ महिन्यात एक कोटी २२ लाख ३१ हजार ८६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन १६२ अवैध दारुचे गुन्हे दाखल करीत ३२२ आरोपींना अटक केली आहे. यामुळे भंडारा, नागपूर व मध्य प्रदेशातील अवैध दारु पुरवठ्यादारांनाही चांगलीच चपराक बसली आहे. त्यामुळे चिमुरातील दारु विक्रेते धास्तावले असल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षापासून नेताजी वॉर्डातील अवैध दारु विक्रेत्यांची चांगलीच दहशत होती. ती आता ओसरली असून शहरात अवैध दारु विक्रीचे प्रमाण कमी झाले आहे. अवैध दारु विक्री प्रकरणात एक आरोपीस तडीपार करुन दोन आरोपींचे एसपीडीए काद्याअंतर्गत प्रस्ताव सादर केले आहेत. या अवैध दारु विक्री विरोधातील कारवाईमुळे नागरिक आनंदले आहेत.
एकट्या चिमूर शहरात ४८ आरोपींना अटक
चिमूर शहरात मागील अनेक वर्षापासून दारु विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या काही भागात चिमूर पोलिसांनी आठ महिन्यात धाड टाकून ३४ लाख ४८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात ३५ गुन्ह्याची नोंद करुन ४८ आरोपींना अटक केली आहे.