आश्वासनानंतर एकोना खाणीतील आंदोलन मागे; ६ दिवसांपासून रोखलेली कोळसा वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 03:22 PM2022-03-16T15:22:00+5:302022-03-16T15:45:06+5:30
कोलि अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
वरोरा (चंद्रपूर) : तालुक्यातील एकोना येथील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी ८ मार्चपासून एकोना कोळसा खाण (Yecona Coal Mine) येथे कामबंद आंदोलन करून कोळसा वाहतूक रोखून धरली होती. याबाबत वेकोलि अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नुकतीच चंद्रपूरजिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,वरोरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे, वेकोलिच्या माजरी एरियाचे व्यवस्थापक व्ही.के.गुप्ता,दिनेश यादव,सागर पिंपळशेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत वेकोलि अधिकाऱ्यांनी ५०० प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यासंबंधी माजरी वेकोलिच्या सक्षम अधिकाऱ्यांना ३० एप्रिल २२ पर्यंत अहवाल पाठविला जाईल व त्यानंतर त्यांना नोकरीत सामावून घेतले जाईल. जलसिंचनाची नोंद असलेल्या सातबारानुसार शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आदेश चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर सुधारित सातबारा मिळताच करारनामे करून योग्य मोबदला संबंधित शेतकऱ्यांना दिला जाईल. १ जानेवारी २२ पासून प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही नोकरी न दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना १ जानेवारी पासूनचे वेतन देण्यासंबंधिचा प्रस्ताव वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्याकडून आलेल्या दिशा-निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल. सोबतच ४०० प्रकल्पग्रस्तांना ३० जूनपर्यंत नोकरीत सामावून घेतले जाईल.
वैद्यकीय तपासणी आता स्थानिक पातळीवरच
नोकरीत सामावून घेतल्या जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरला न पाठविता यापुढे आरोग्य विभागाची संबंधित टीम स्थानिक पातळीवर येऊन संबंधित प्रकल्पग्रस्तांची आरोग्य तपासणी करेल. या मागण्या बैठकीत उपस्थित वेकोलि अधिकाऱ्यांनी मान्य केल्या. या बैठकीनंतर मुकेश जीवतोडे यांनी सहा दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. तसेच कोळसा वाहतुकीचा मार्गही मोकळा करून दिला.