चांदली ग्रामपंचायतीची निवडणूक बेकायदेशीर
By admin | Published: February 24, 2016 12:58 AM2016-02-24T00:58:01+5:302016-02-24T00:58:01+5:30
चांदली येथील ग्रामपंचायतीची नुकतीच झालेली निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य नंदलाल करंबे यांनी केला आहे.
नंदलाल करंबे यांचा आरोप : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
ब्रह्मपुरी : चांदली येथील ग्रामपंचायतीची नुकतीच झालेली निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य नंदलाल करंबे यांनी केला आहे.
तालुक्यातील चांदली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. सरपंच व उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदार यांनी ग्रामपंचायत अधिनियम १६४८ कलम ३५/३ अन्वये अविश्वास हस्तानुसार १६ फेब्रुवारी २०१६ ला निवडणूक घेतली.
परंतु तहसीलदार व अपासी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून तारीख न ठरविता आपल्या अधिकारातून मनमानी कारभार करून निवडणूक घेतली आहे. कायद्याने जिल्हाधिकारी चंद्रपूर व उपायुक्त नागपूर विभाग यांचा आदेश न जूमानता मुदतीच्या आत तहसीलदारांनी सरपंच व उपसरपंचाची निवडणूक घेतली आहे.
कायद्याने ग्रामपंचायत अधिनियम ३३/१ नुसार सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक तारीख व वेळ ठरविणे जिल्हाधिकारी यांच्या कक्षात येते. निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदार अथवा अध्यासी अधिकारी यांना ठरविण्याची कुठेही तरतूद नाही. मात्र त्यांनी कलम ३३/१ चा वापर न करता कलम ३५/३ चा वापर केला आहे, असे नंदलाल करंबे यांनी म्हटले आहे.
वास्तविक पाहता कलम ३५/३ चा नियम या पदाच्या निवडणुकीसाठी लागू होत नाही. त्यामुळे अपुऱ्या कायद्याच्या आधारावर तहसीलदाराने निवडणूक घेऊन मनमानी कारभार केला असल्याचा आरोप नंदनलाल करंबे यांनी केला आहे. या निवडीची पूर्ण प्रक्रिया रद्द करून कायदेशिर निवडणुकीची प्रक्रिया राबविण्याची मागणी त्यांनी केली असून याबाबत एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याचे म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)