नगराध्यक्षाची निवडणूक सहा महिने लांबली
By admin | Published: June 18, 2014 12:08 AM2014-06-18T00:08:39+5:302014-06-18T00:08:39+5:30
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन नगराध्यक्षाची निवडणूक होणार होती. ती आता सहा महिने लांबणीवर गेली आहे. नगराध्यक्षासोबतच उपाध्यक्षालाही सहा महिने मुदतवाढ मिळाली आहे.
बल्लारपूर : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन नगराध्यक्षाची निवडणूक होणार होती. ती आता सहा महिने लांबणीवर गेली आहे. नगराध्यक्षासोबतच उपाध्यक्षालाही सहा महिने मुदतवाढ मिळाली आहे. आता, या दोनही पदांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार आहे.
विद्यमान नगराध्यक्षाचा अडीच वर्षाचा कार्यकाल २९ जूनला संपत असल्यामुळे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन नगराध्यक्षाची निवडणूक होणे निश्चित होते. या निवडणूकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, ही निवडणूक सहा महिने पुढे गेल्यामुळे विद्यमान नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांना आणखी सहा महिने कारभार बघावा लागणार आहे. सहा महिने निवडणूक लांबल्यामुळे या पदाच्या निवडणूकीकरिता इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. बल्लारपूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या रजनी घनशाम मुलचंदानी या आहेत. या नगरपरिषदेचा पुढील नगराध्यक्ष अनुसूचित जमाती महिलांकरिता राखीव आहे. येथे त्या प्रवर्गाच्या काँग्रेसच्या छाया मडावी आणि अपक्ष मीना मडावी या दोनच नगरसेविका आहेत व त्यांची नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत उभे राहण्याची तयारी चालली होती. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. ही निवडणूक सहा महिने पुढे गेल्याने साऱ्या हालचाली आता थंडावल्या आहेत. विधानसभा निवडणूकीचा ताण असल्यामुळे नगराध्यक्षाच्या निवडणूका पुढे ढकलल्याचे सांगण्यात येते. पण, लोकसभा निवडणूकीत भाजपाची लाट चालली. या ताज्या लाटेचा परिणाम नगराध्यक्षाच्या निवडणूकीवर पडू नये आणि काँग्रेसला याही निवडणूकीत फटका बसू नये याकरिता राज्य शासनाने नगराध्यक्षाच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत, असे काहींचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)