ईव्हीएमच्या विश्वासार्र्हतेसाठी निवडणूक विभागाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 06:00 AM2019-09-12T06:00:00+5:302019-09-12T06:00:41+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून देशपातळीवर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर विरोधी पक्षांकडून संशय व्यक्त केला जात आहे. एवढेच नाही तर निवडणूक आयोगाकडे मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. मात्र निवडणूक विभागाने कोणत्याही परिस्थितीत मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेणार नसल्याचे ठामपणे सांगितले आणि ही मागणी मागे पडली.
साईनाथ कुचनकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशपातळीवर विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यासाठी विविध आंदोलनाचे हत्यारही उपसल्या गेले. असे असले तरी विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये संभ्रम राहू नये यासाठी चंद्रपूर जिल्हा निवडणूक विभागाद्वारे जिल्ह्यातील २ हजार ७० मतदार केंद्रावर थेट इव्हीएमद्वारे मतदारांना प्रात्याक्षिक करून दाखविल्या जात आहे. सोबतच विविध चौकांमध्येही मोठ्या प्रमाणात फ्लॅक्स लावण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून देशपातळीवर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर विरोधी पक्षांकडून संशय व्यक्त केला जात आहे. एवढेच नाही तर निवडणूक आयोगाकडे मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. मात्र निवडणूक विभागाने कोणत्याही परिस्थितीत मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेणार नसल्याचे ठामपणे सांगितले आणि ही मागणी मागे पडली. त्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडली. मात्र सत्ताधारी पक्षांना मिळालेल्या बहुमतामुळे पुन्हा विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी करून ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. या मागणीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून मतदार गोंधळात पडले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने ईव्हीएमची जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरातील २०७० केंद्रावर ही मोहीम सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक एसडीओंना पाच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट पुरविण्यात आले आहे. याद्वारे प्रत्येक केंद्रात पथकाद्वारे मतदारांकडून डमी मतदान करून घेतल्या जात असून त्यांच्यासमोरच मतमोजणीही करून घेतली जात आहे. या माध्यमातून विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.
विविध पथकांद्वारे प्रत्येक विधानसभानिहाय मतदारांमध्ये जनजागृती मोहीम आरंभण्यात आली आहे. या माध्यमातून मतदारांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डमी मतदान घेऊन मतदानाची मोजणी सुद्धा करून दाखविण्यात येत आहे.
- संपत खलाटे उपजिल्हाधिकारी
(निवडणूक), चंद्रपूर