कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींना निवडणुकांचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:21+5:302021-07-10T04:20:21+5:30
नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या मुदत येत्या जुलै महिन्यात संपत आहे. तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार ...
नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या मुदत येत्या जुलै महिन्यात संपत आहे. तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. पाच वर्षे पूर्ण होऊन ग्रामपंचायतीची संपूर्ण सत्ता संपुष्टात येताना गावागावातील नेते तसेच कार्यकर्ते दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आता कामाला लागलेले दिसत आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर जाणार असल्याचे बोलले जात असले तरी कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र पाहायला मिळत आहे. तालुक्यामध्ये ग्रामपंचायती या शेतकरी संघटना, काँग्रेस, बिजेपी या पक्षाच्या हाती असलेल्या दिसून येते. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये शेतकरी संघटनेसह कॉंग्रेसचाही वर चष्मा असलेला तालुक्यात दिसून आला तर काही ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाने यश मिळविले तालुक्यातील मोठ्या व श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नांदा, बिबी, लखमापूर, उपरवाही आदी गावांतील निवडणुकाही दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्यामुळे मोठ्या गावातील ग्रामपंचायती काबीज करण्यासाठी नेतेमंडळी आता गावागावात येताना दिसत आहे. कुठे विकासकामामुळे लोकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. काही गावांमध्ये सत्तेविरुद्ध रोषही व्यक्त केला जात आहे. प्रमुख्याने तालुक्यात काँग्रेस, शेतकरी संघटना आणि भारतीय जनता पार्टी यामध्ये प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.