१२ बाजार समित्यांची निवडणूक : आघाडीत राष्ट्रवादीला डच्चू, काँग्रेसचे भाजपशी संधान!
By राजेश मडावी | Published: April 22, 2023 02:51 PM2023-04-22T14:51:02+5:302023-04-22T14:55:05+5:30
सहकारातील सत्तेसाठी एकमेकांविरूद्ध कुरघोडी
चंद्रपूर : जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन टप्प्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येकी १८ प्रमाणे २१६ संचालकपदासाठी ४७६ उमेदवार रिंगणात आहेत. बहुतांश ठिकाणी भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत होण्याची चिन्हे असली तरी काही ठिकाणी भाजपा व काँग्रेस अशी मैत्री होऊन महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीला डच्चू देण्यात आला; तर कुठे काँग्रेस विरुद्ध काँग्रेस, शेतकरी संघटन, भाजपा, काँग्रेस व शिवसेना अशी युतीही जन्माला आली आहे.
नागभीड येथील बाजार समितीसाठी ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांतच लढती यंदा लढत होणार आहे. पोंभूर्णा बाजार समितीत ४०, वरोरा ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या बाजार समितीवरील बहुतांश माजी संचालक, सभापती, उपसभापती काँग्रेस समर्थक असल्याने भाजपाच्या तुलनेत काँग्रेसचे पारडे जड आहे. ब्रम्हपुरी ३९, सिंदेवाही ३६, राजुरा ३७, कोरपना ५२, मूल ३१, चंद्रपूर ४३, भद्रावती ३९, चिमूर ३६ व गोंडपिपरी ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
पक्षनिष्ठा बाजूला ठेवून विरोधकांशी हातमिळवणी
मूल बाजार समितीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत गटाचे वर्चस्व आहे. येथे खासदार बाळू धानोरकर व रावत हे काँग्रेसचे दोन नेते एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. ब्रम्हपुरीत माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार व भाजपने मैत्री केली. चंद्रपूर समितीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे एकत्र आले. या दोघांनी बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांच्याविरूद्ध आघाडी उघडली. राकाँचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी उमेदवार उभे करून ताकद पणाला लावली आहे.
दोन संघात सर्वाधिक उमेदवार
जय- पराजयाचे गणित ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सहकार व ग्रामपंचायत मतदार संघातच सर्वाधिक मतदार आहेत. त्यातच उमेदवारांचीही संख्या वाढली. सहकारमधून २८४ तर ग्रामपंचायत संघातून १०३, व्यापारी ५८० हमाल मापारी ३१ असे एकूण ४७४ उमेदवार भविष्य आजमावित आहेत.
कुणाला कपबशी तर कुणाला बॅट, किटली !
गोंडपिपरी, भद्रावती, पोंभुर्णा येथे ३० एप्रिल तर ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभीड, राजुरा, कोरपना, मूल, चंद्रपूर, चिमूर, सिंदेवाही येथे २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. शुक्रवारी २१ एप्रिलला उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप झाले. यात कपबशी बॅटपासून तर गिटार, किटलीपर्यंत २५ पेक्षा अधिक चिन्हांचा समावेश आहे.