जिल्ह्यात १७ सदस्यीय ९ ग्रामपंचायतीत होणार निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:37 AM2020-12-30T04:37:59+5:302020-12-30T04:37:59+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या एकूण ग्रामपंचायतीपैकी तब्बल ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. ...
चंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या एकूण ग्रामपंचायतीपैकी तब्बल ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात १७ सदस्य संख्या असलेल्या ९ ग्रामपंचायती आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गजांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकीय पक्षांचे जिल्ह्यात अस्तीत्व टिकून राहणार आहे.
सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये चिमूर तालुक्यातील शंकरपूर, भिसी, नेरी या तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर नागभीड तालुक्यातील तळोधी, बल्लारपूर तालुक्यात विसापूर, वरोरा तालुक्यातील माजरी, तसेच चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर, उर्जानगर आणि घुग्घुस या मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या वादात सापडली असून येथील नागरिकांनी शहरातील नगरपरिषदेचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने यासाठी पुढाकार घेत नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची नाही, या मुद्यावर येथील नागरिक ठाम आहे. दरम्यान, विविध मार्गाने आंदोलनही सुरु करण्यात आले आहे.
जिल्ह्यात १७ सदस्य संख्या असलेल्या प्रमुख आणि राजकीय दृष्टी संवेदनशील अशा या ग्रामपंचायती असल्याने प्रमुख राजकीय पक्षांसह इतर लहान पक्षांनीही आपआपले उमेदवार पॅनल बनवून उभे केले आहे. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकीय पक्षांची भविष्यातील रणनीती ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण याकडे लक्ष ठेवून आहे.
---
६२९
निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती
---
सर्वात मोठ्या ग्रामपंचायती
शंकरपूर, भिसी, नेरी, तळोधी, विसापूर,माजरी, घुग्घुस, दुर्गापूर, उर्जानगर
----
सर्वात लहान ग्रामपंचायती
जिल्ह्यात सात सदस्यीय ग्रामपंचयी असून काही ग्रामपंचायतीमध्ये गट ग्रामपंचायत आहे.
----
एकूण सदस्य संख्या
१७
-----
घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणूक अधांतरी
राज्य सरकारने घुग्घुस ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देण्याची अधिसुचना काढली आहे. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर येथेही ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे येथे आंदोलन केले जात आहे. दरम्यान याकडे जिल्ह्यातील नागिरकांचे लक्ष लागले आहे.