शासन आदेशाला डावलून विद्युत व्यवस्थापकाची निवड
By admin | Published: April 1, 2017 01:45 AM2017-04-01T01:45:55+5:302017-04-01T01:45:55+5:30
ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनेतंर्गत महाराष्ट्र शासनाने विद्युत व्यवस्थापकाची निवड करण्याचे आदेश काढला.
चेक ढाणेवासना येथील प्रकार : ग्रा.पं. सदस्यांचा मनमानी कारभार
गोंडपिपरी : ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनेतंर्गत महाराष्ट्र शासनाने विद्युत व्यवस्थापकाची निवड करण्याचे आदेश काढला. मात्र काही गावात शैक्षणिक अर्हताधारक लाभार्थ्यांना डावलून राजकीय आकसापोटी आपल्या जवळच्या नातेवाईकाची निवड करण्याचा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील चेकढाणेवासना येथे उघडकीस आला आहे.
ग्रामीण भागातील नागरिक नेहमीच विजेच्या लपंडावाने त्रस्त असतात. लाईनमन ग्रामीण भागात वेळेवस सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागात विद्युत व्यवस्थापकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. मात्र पोंभुर्णा तालुका अंतर्गत येत असलेल्या चेकढाणेवासना येथे विद्युत व्यवस्थापकाची निवडीमध्ये गैरप्रकार करुन शासन आदेशाला डावलून नेमणूक करण्यात आल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे. विद्युत व्यवस्थापकाची जाहिरात प्रसिद्ध होताच, निखील नामदेव उपासे, योगेश बाबूजी ठुसे, तामदेव माधव मेश्राम, राजेंद्र देवाजी राऊत आदी उमेदवारानी अर्ज दाखल केले होते. शासन आदेशानुसार निखील नामदेव उपासे हा पात्र उमेदवार होता. परंतु राजकीय आकसापोटी योगेश बाबुजी ढुसे यांची निवड करण्यात आल्याचा आरोप निखील उपासे यांनी केला आहे.
शैक्षणिक अर्हतेनुसार निखील उपासे हा योगेश ढुसे यांच्यापेक्षा सरस आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सचिवानी निखील उपासे यांच्या निवडीच्या जीआरचे वाचन केल्यानंतरही ग्रामपंचायत सदस्यांनी या निर्णयाला बगल देत योगेश ढुसे याची निवड केली. योगेश ढुसे यांचे ग्रा.पं. सदस्य परशुराम वाढई यांच्याशी जवळचे संबध असल्याने त्याची निवड करण्यात आल्याचा आरोप निखील उपासे यांनी केला आहे.
(शहर प्रतिनिधी)