विधानसभेसाठी मतदारयादीचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:04 PM2019-07-17T23:04:48+5:302019-07-17T23:05:13+5:30
काही महिन्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाने जाहीर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : काही महिन्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाने जाहीर केला आहे.
यामध्ये १५ ते ३० जुलैपर्यंत मतदान नोंदणी संदर्भात दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून अंतिम यादी १९ आॅगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
नाव नोंदणीपासून वंचित मतदारांसाठी आयोगाने १ जानेवारी या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा दुसरा पुनर्निरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये १५ ते ३० जुलैपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहे. यानंतर २०, २१, २७ व २८ जुलै रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
पर्यवेक्षकाद्वारे ५ आॅगस्टला तपासणी, १३ आॅगस्टला दावे निकाली काढणे, १६ आॅगस्टला उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याद्वारे मतदार याद्यांची विशेष तपासणी व १९ आॅगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. एवढेच नाही तर विधानसभेसाठी इच्छुकांनी आपला जनसंपर्क वाढविला असून विविध कार्यक्रमांद्वारे गावागावांत भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
व्हीआयपी अन् दिव्यांगाची नावे चिन्हाकिंत
मतदार यादीत खासदार, आमदार यांच्यासह कला, पत्रकारिता, क्रीडा, न्यायपालिका व इतर क्षेत्रातील मान्यवरांची नावे चुकीने वगळली जावू नये, यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आयोगाने सूचना दिल्या आहेत.
दिव्यांग असल्याबाबत नमुना ६ मध्ये माहिती उपलब्ध असल्याने डेटाबेसमध्ये चिन्हांकित करावी व दिव्यांगत्वाबाबतची माहिती उघड करू नये. अपंग मतदाराला सामावून घेण्यासाठी शासकीय विभाग,संस्थाना सहभागी करावे,असेही आयोगाने म्हटले आहे.
राजकीय पक्षांसोबत बैठक
प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यापूर्वी डीईओद्वारे राजकीय पक्षांसोबत स्वतंत्रणे बैठक घेण्यात येणार आहेत. त्यांना कार्यक्रमाची माहिती दिली जाणार आहे. यासाठीचे लेखी पत्र त्यांना दिले जाणार आहे. तसेच मतदार नोंदणी अधिकाºयांनी दावे व हरकतीची यादी सर्व राजकीय पक्षांना दर आठवड्यास उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यादी प्रसिद्ध झाल्यावर राजकीय पक्षांना दोन प्रती विनामूल्य देण्यात याव्या, असे आयोगाचे आदेश आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी १५ ते ३० जुलै दरम्यान नेमून दिलेले मतदान केंद्र, तहसील कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करावा. तसेच मतदार यादीत नाव असल्याबाबत खात्री करून घ्यावी. छायाचित्र मतदार यादीत अद्यावत करण्याकरिता आवश्यक ते सहकार्य करावे.
- डॉ.कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर