वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आमदाराचा ‘हाय होल्टेज शॉक’
By admin | Published: November 22, 2014 10:59 PM2014-11-22T22:59:32+5:302014-11-22T22:59:32+5:30
आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्याच जनता दरबारात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या कामचुकार वृत्तीबाबत आमदार बाळू धानोरकर यांनी चांगलेच धारेवर धरले. सर्वाधिक तक्रारी
भद्रावती : आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्याच जनता दरबारात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या कामचुकार वृत्तीबाबत आमदार बाळू धानोरकर यांनी चांगलेच धारेवर धरले. सर्वाधिक तक्रारी असणाऱ्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी ‘हाय होल्टेज शॉक’ देत येत्या आठ दिवसात तक्रारींचे निराकरण करावे, असे खडसावले. आठवड्याभरात पुन्हा एक बैठक घेणार असल्याचे सांगत गावांमध्ये सुद्धा जनता दरबार भरविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
जनतेच्या प्रलंबित समस्या व तक्रारी ऐकूण घेऊन त्या निकाली लावण्याच्या दृष्टीने आमदार बाळू धानोरकर यांनी नग परिषद सभागृह भद्रावती येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. तालुक्यातील विविध विभागातील एकूण ४४ तक्रारी याप्रसंगी प्राप्त झाल्या. वीज मंडळ, पंचायत समिती, एसटी महामंडळ, तहसील कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याशिवाय अन्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे, दत्ता बोरीकर उपस्थित होते. ग्रामीण भागात काही ठिकाणी दोन वर्षापूर्वी पैसे भरून अजुनही मीटर बसविण्यात आले नाही. ट्रान्सफार्मर जळाले तर लवकर वीज येत नाही. दोन महिन्यापासून मीटर बंद, विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे, कामाबाबत अतिशय दिरंगाई याबाबतच्या अनेक तक्रारी उपस्थित नागरिकांनी याप्रसंगी केल्या. सर्वात जास्त तक्रारी वीज मंडळाच्या कारभाराबाबत होत्या. वीज मंडळाच्या कारभारात सर्वाधिक घोळ असून लवकरात लवकर तक्रारी निकालात काढण्याची तंबी आमदारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. पोलीस पाटील, सरपंच यांना बोलावून त्यांना पंचायत समितीच्या योजना समजावून सांगा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. तहसील कार्यालय व मल्हारीबाबा सोसायटी येथे बस थांब्याकरिता कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले. याचा त्या क्षेत्रातील नागरिकांना लाभ मिळेल असे ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)