दोन महिन्यांपासून वीज ग्राहक मीटरच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:29 AM2021-03-10T04:29:13+5:302021-03-10T04:29:13+5:30
सावली : महावितरण कंपनीकडून पुरविण्यात येणाऱ्या विद्युत मीटरचा मागील दोन महिन्यांपासून तुटवडा निर्माण झाला आहेत. तसेच पुढील दोन ...
सावली : महावितरण कंपनीकडून पुरविण्यात येणाऱ्या विद्युत मीटरचा मागील दोन महिन्यांपासून तुटवडा निर्माण झाला आहेत. तसेच पुढील दोन महिने तरी महाराष्ट्रातील ग्राहकांना विद्युत मीटर मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
अनेक ग्राहकांनी विद्युत जोडणीकरिता महावितरण कंपनीकडे अर्ज सादर केला आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून या कंपनीकडून विद्युत मीटरचा पुरवठा बंद केल्याने अनेक ग्राहक अडचणीत आले आहेत, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या समस्येचे निराकरण करताना नाकीनऊ आले आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संपूर्ण महाराष्ट्रातच कंपनीने विद्युत मीटरचा पुरवठा बंद केल्याने पुढील दोन महिने म्हणजे एप्रिल २०२१ पर्यंत तरी मीटर मिळणे दुरापास्त असल्याचे ‘लोकमत’जवळ सांगितले. तालुकाच नव्हे, तर जिल्हा आणि राज्यस्तरावरील अनेक वीज ग्राहक विद्युत जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. खासगी दुकानातून विद्युत मीटर घेण्याची परवानगी महावितरण कंपनीकडून देण्यात आली आहे. मात्र ते मीटर महावितरण कंपनीकडून प्रमाणित झालेले असावे, अशा सूचना ग्राहकांना देण्यात येत आहेत. खासगी दुकानातून घेतलेले मीटर आणि महावितरण कंपनीच्यावतीने देण्यात येणारा परतावा या रकमेत बरीच तफावत असल्याने सर्वच ग्राहक विभागातील मीटरच्याच प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे.