विद्युतसेवकांना आदेश नाही; अप्रशिक्षितांकडून कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:44 AM2018-06-22T00:44:33+5:302018-06-22T00:44:33+5:30
करंजी येथील चंद्रजित गव्हारे हे पथदिव्यांचे काम करताना विद्यूत प्रवाहाने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. सावली तालूक्यातही अशीच घटना घडल्याने गावात तणाव निर्माण झाला. गावागावात विद्युत सेवक नेमण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर: करंजी येथील चंद्रजित गव्हारे हे पथदिव्यांचे काम करताना विद्यूत प्रवाहाने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. सावली तालूक्यातही अशीच घटना घडल्याने गावात तणाव निर्माण झाला. गावागावात विद्युत सेवक नेमण्यात आले. पण महावितरण कंपनीने त्यांना आदेशपत्र दिले नाही. अप्रशिक्षितांकडून ही कामे केली जात आहेत. या घटनांत वाढ होऊ शकते. संभाव्य धोका लक्षात घेता पथदिव्याची ही जबाबदारी विद्युत कंपनीकडे देण्याची मागणी गोंडपिपरी तालूका सरपंच संघटनेने जि. प. च्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यात करंजी व व्याहाळ गावात पथदिव्यांचे काम करताना दोघांचा मृत्यू झाला. कुटुंंबीयांनी मदतीच्या मागणीसाठी चक्क तीन तास मृतदेह ग्रामपंचायतीमध्ये ठेवला. गावात प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती. राजकीय विरोधातून सरपंच व सचिवांना विनाकारण धारेवर धरण्यात आले. एवढेच नाही, तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील करण्यात आली. खरे तर मजुरांनी स्वत:च्या जबाबदारीवर काम करू असे स्वाक्षरीसह करारनामा लिहून दिला होता. पथादिव्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पूर्वी विद्युत कंपनीकडे होती. पण त्यांनी जबाबदारी नाकारल्याने या कामासाठी गावागावांत विद्युत सहायकांची निवड करून ही यादी कंपनीकडे पाठविण्यात आली. अद्यापही त्यांना आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे अप्रशिक्षितांच्या भरवशावर ही कामे सूरू आहेत.
यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या मुद्याला विरोधक राजकीय स्वरूप देत असल्याने गावातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला.
या सर्व घटना लक्षात घेवून प्रशासनाने तातडीने पथदिव्यांची जबाबदारी विद्यूत कंपनीकडे सोपवावी व ग्रामपंचायतीची यापासून मुक्तता करावी, अशी मागणी तालूका सरपंच संघटनेने निवेदनातून केली आहे.
यावेळी तालूकाध्यक्ष हंसराज रागीट, करंजीच्या सरपंच ज्योती चिचघरे, बोरगाव च्या सरपंच अमावश्या निमसरकार, आक्सापूरच्या सरपंच अल्का पिपरे, विठ्ठलवाडा येथील सरपंच नितीन काकडे, प्रेमीला मडावी, फुला शेरकी, व गोंडपिपरी तालुक्यातील सरपंचांनी केली आहे. पथदिवे दुरूस्ती करताना ज्या युवकांचा जीव गेला. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत दिली पाहिजे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.