चिमूर तालुक्यातील विजेची समस्या कायमस्वरुपी निकाली निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:48 PM2019-09-16T23:48:59+5:302019-09-16T23:49:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिमूर : चिमूर विधानसभा क्षेत्रात सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसमोर विजेचा मोठा प्रश्न होता. कमी दाबाच्या पट्टयामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर विधानसभा क्षेत्रात सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसमोर विजेचा मोठा प्रश्न होता. कमी दाबाच्या पट्टयामुळे शेतकºयांना पिकांना पाणी देताना मोठ्या अडचणी जात होत्या. व्यावसायिक व नागरिकांनाही यामुळे त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या हेरून आपण चिमूर तालुक्यातील कोलारा येथे १३२ केव्हीच्या उपकेंद्राला मंजुरी मिळविली. यासह ३३ केव्हीचे वीज केंद्रही अनेक गावात मिळविले. यामुळे विजेची समस्या आता निकाली निघणार आहे, अशी माहिती आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी दिली चिमूर तालुक्यासाठी मंजूर झालेल्या १३२ केव्ही उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
चिमूरचे वाढते शहरीकरण आणि वाढती विजेची मागणी, त्यामुळे होणारा कमी दाबाचा वीज पुरवठा या समस्येवर मार्ग काढीत पाच वर्षाच्या काळात चिमूर तालुक्यातील खडसंगी, जांभूळघाट, मासळ बु. येथे ३३ केव्हीचे केंद्र नव्याने मजूर करून कार्यान्वित केले. आज १३२ केव्ही व खांबाडा येथे ३३ केव्हीच्या केंद्राचे भूमिपूजन करून वीज समस्या आपण निकाली काढली आहे, असेही यावेळी आ. भांगडिया यांनी सांगितले. चिमूर तालुक्यासाठी १६ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या १३२ केव्ही उपकेंद्राचे शंकरपूर जवळच्या (कोलारी) चिमूर येथे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन पार पडले. यावेळी कोलारीच्या सरपंच गावंडे, भाजपा जेष्ठ नेते वसंत वारजूकर, प्राचार्य टिपले,सतीश जाधव, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश अणे, अधीक्षक अभियंता अविनाश निबाळकर, संजय आत्राम, प्रविणकुमार दामके आदी उपस्थित होते. यावेळी नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सतिश अणे म्हणाले, मे २०१९ मध्ये हे केंद्र मंजूर झाले असून कंत्राटदार नियुक्त असून कार्यारंभ आदेश दिला आहे. या प्रकल्पासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. ना. नितीन गडकरींनी नाममात्र शुल्कावर ९९ वर्षांसाठी लिजवर जागा दिल्याने हा केंद्र येथे उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
खांबाडा येथेही ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र
चिमूर तालुक्यातील खांबाडा येथे ३३/११ वीज उपकेंद्र कार्यान्वित होईल. तेव्हा या परिसरातील शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांना पूर्ण दाबाचा वीज पुरवठा होणार असून विजेची समस्या सुटेल, असे मत आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी खांबाडा येथील वीज उपकेंद्र भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केले. यावेळी डॉ.श्याम हटवादे, वसंत वारजूकर, कार्यकारी अभियंता राठी, संजय जलगावकर, सरपंच हरी दडमल, डॉ. गजबे, रामेश्वर कोथळे, योगिता चौखे, दुर्गाताई चौखे उपस्थित होते.