वीज ग्राहकांना वीजमंडळाचा शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:40+5:302021-06-26T04:20:40+5:30
घुग्घुस : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊनमुळे पूर्वीच मेटाकुटीस आलेल्या नागरिकांना सर्व बाजूंनी सर्वसामान्यांना मोठी झळ सोसावी लागत आहे. ...
घुग्घुस : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊनमुळे पूर्वीच मेटाकुटीस आलेल्या नागरिकांना सर्व बाजूंनी सर्वसामान्यांना मोठी झळ सोसावी लागत आहे. त्याच आता वीजमंडळाने वीज देयके भरा अन्यथा वीज कापण्याचा इशारा लाऊड स्पीकर वरून देऊन २१ जूनपासून वीज कापण्याची मोहीम सुरु केली आहे. पाच दिवसात सुमारे १२० वीज ग्राहकांची वीज कापण्यात आल्याची माहिती स्थानिक वरिष्ठ अभियंता अमोल धुमणे यांच्याकडून मिळाली. या मोहिमेमुळे महावितरण व लोकप्रतिनिधींवर मोठा संताप व्यक्त होत आहे.
मागील वर्षीच्या लाॅकडाऊनच्या काळात विविध पक्षाने आपापल्यापरीने आंदोलने करून बिल भरू नये म्हणून भाषणे ठोकून बिलाची होळी केली. मात्र वीज माफ झाले नाही. शेवटी वीज ग्राहकांनी थकीत रकमेची जुळवाजुळव करीत वीज देयके भरली. मागील लाॅकडाऊनने मेटाकुटीस आलेले सर्वसामान्य नागरिक, मजूर वर्ग अधिक संकटात सापडली. जीवन जगणे मुश्किल झाले. अशातच मुलाचे ऑनलाईन शिक्षण, शाळा नसताना फी भरण्यास भाग पडणाऱ्या गंभीर प्रश्नांवर नेत्यांना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देता आला नाही. आता वीज कंपनी धडाधड वीज कापत असतानाही लोकप्रतिनिधी गप्प बसले आहेत. वीज देयके भरण्यास ग्राहकांना सक्ती करू नये, त्यांच्या सोईनुसार बिल भरण्याची मुभा द्यावी, बिलात जोडलेली विविध कर माफ करावे व वीज कनेक्शन कापू नये, अशी मागणी वीज ग्राहकांकडून होत असून ग्राहक रस्त्यावर उतरण्याच्या मनस्थितीत आहेत.