नवरात्रोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज; अर्ज केल्यानंतर अवघ्या काही तासांत वीजजोडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 02:44 PM2024-10-01T14:44:54+5:302024-10-01T14:45:59+5:30
Chandrapur : अर्ज करा, त्वरित मिळेल वीज मीटर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आदिशक्तीची आराधना करणाऱ्या 'नवरात्र' आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना पवित्र बौद्ध धर्माची दीक्षा दिलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक आहे. हे दोन्ही उत्सव सर्वांना आनंददायी व निर्विघ्न पार पडावेत, यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी धार्मिक उत्सवांसाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणतर्फे चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे यांनी केले आहे.
सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीत म्हणजे घरगुती दराने वीजपुरवठा करण्याचा निर्णय महावितरण घेतला आहे. त्यामुळे अर्ज करून रीतसर वीजपुरवठा मंडळांना घेता येणार आहे. अर्ज केल्यानंतर अवघ्या काही तासांतच आयोजकांना वीजजोडणी मिळू शकेल. त्यासाठी त्यांनी वेबसाइटवर जाऊन न्यू कनेक्शन विभागात तात्पुरती वीजजोडणीच्या लिंकवर जावे लागणार आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शीघ्र प्रतिसाद पथके मोक्याच्या ठिकाणी तैनात केली जाणार आहेत.
मंडपात हे करू नये...
- अवैध एक्स्टेन्शन घेऊन थेट अवैध वीजपुरवठा घेऊ नये. वायरिंगना चुकीच्या जोड देणे टाळावे.
- मीटर केबिनच्या प्रवेशद्वारात कोणतेही अडथळे ठेवू नयेत.
- मंजूर वीजभारापेक्षा जास्त वीजभार वापरू नये.
- मोठे दिवे, फ्लड लाइट, मोठे पंखे तसेच वायरिंगच्या जोडण्यांना स्पर्श होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- मीटर केबिनमध्ये आणि धोकादायक वस्तू ठेवू नयेत.
दुर्गोत्सव टोलफ्री क्रमांक
महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १८००-२१२- ३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहे.
मंडपांमध्ये अशी घ्यावी खबरदारी
- वायरिंग सुसज्ज असावी. मीटर केबिनमध्ये फक्त अधिकृत व्यक्तींना प्रवेश द्यावा.
- वीजजोडण्यांसाठी मान्यताप्राप्त वायर आणि स्वीच वापरावेत.
- आपत्कालीन स्थितीमध्ये वीजपु- रवठा खंडित करण्यासाठी एक पॉइंट असावा.
- वायरिंगना लावण्यासाठीच्या टेप मान्यताप्राप्त असाव्यात.
- मीटर केबिन आणि कनेक्शनच्या परिसरात जाण्यासाठी वाट ठेवावी.
- मंजूर केलेल्या वीज क्षमतेएवढाच वीजभार मंडपात वापरण्यात यावा.
- न्यूट्रलचे व्यवस्थित अर्थिग व्हावे. मीटर केबिनला अर्थिग आवश्यक, एक्स्टेन्शनसाठी थ्री पिन प्लग वापरावा.
- अग्निशामन उपकरण मीटर केबि- नजवळ ठेवावे