अकरापैकी आठ सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:36 AM2019-08-15T00:36:22+5:302019-08-15T00:41:21+5:30
मागील पंधरा-सोळा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जुलै महिन्यापर्यंत कोरडेच असलेल्या सिंचन प्रकल्पात आता चांगलाच जलसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यात अकरा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यातील आठ प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील पंधरा-सोळा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जुलै महिन्यापर्यंत कोरडेच असलेल्या सिंचन प्रकल्पात आता चांगलाच जलसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यात अकरा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यातील आठ प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहेत. तर नदी, नाले, शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हणजे तलावदेखील तुडूंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढील सिंचनाचा प्रश्न तुर्तास मिटला आहे.
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. परिणामी शेतकºयांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. रबी हंगामानेही शेतकºयांना पाहिजे तसा फायदा करवून दिला नाही. तरीही यंदा शेतकरी पुन्हा खरिपाच्या तयारीला लागला. मात्र समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून योग्य वेळी आला नाही. शेतकºयांनी पेरणी थांबविली. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाणी नव्हते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. अशातच जुलैच्या अखेर तीन दिवसांपासून आतापर्यंत जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वर्धा, पैनगंगा, उमा, शिरणा, इरई यासारख्या नद्या व मोठे नाले तुडुंब भरले आहेत. आठ सिंचन प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले आहेत.
सिंचन प्रकल्पातील जलसाठा
चंदई, चारगाव, लभानसराड, डोंगरगाव, इरई, आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर या आठ प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा आहे. हे प्रकल्प सद्यस्थितीत ओव्हरफ्लो झाले आहेत. तर अमलनाला प्रकल्पात ८४.२९ टक्के, पकडीगुड्डम प्रकल्पात ७८.४७ टक्के, लालनाला प्रकल्पात ८८.७१ टक्के जलसाठा आहे. असा पाऊस पडत राहिला तर हे प्रकल्पही ओव्हरफ्लो होतील.
मामा तलावही तुडुंब
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. हे सर्व तलाव आता शंभर टक्क़े भरले आहेत.