विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात एल्गार
By admin | Published: September 28, 2016 12:58 AM2016-09-28T00:58:04+5:302016-09-28T00:58:04+5:30
गोंडवाना विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्त्वात धडक मोर्चा काढला.
अभाविपच्या नेतृत्त्वात धडक मोर्चा : मागण्या पूर्ण न झाल्यास करणार तीव्र आंदोलन
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्त्वात धडक मोर्चा काढला. विद्यापीठाच्या अकार्यक्षमतेमुळे विद्यार्थ्यांवर शैक्षणिक अन्याय होत असून तो त्वरीत दूर करावा, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाल्यापासून विद्यापीठाच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी येत आहेत. परीक्षेचे नियोजन, निकाल, पेपर तपासणी, परीक्षा शुल्कात वाढ इत्यादी बाबींचा यात समावेश आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, याची दखल घेण्यात न आल्याने अभाविपच्या वतीने विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे जिल्हा संयोजक रघुवीर अहीर, क्षेत्रीय सहसंघटकमंत्री सुरेंद्र नाईक यांच्या नेतृत्त्वात काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. रघुवीर अहीर, सुरेंद्र नाईक यांनी मोर्चातील विद्यार्थ्यांना संबोधित केले.
विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांच्या शुल्कात वाढ केली आहे. तसेच विद्यापीठाच्या पेपर तपासणीत मोठा घोळ झाला आहे. यासाठी पूनर्मूल्यांकनाकरिता अर्ज करण्याच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असतानाही विद्यापीठाकडून मात्र यावर कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. हे अन्यायपूर्ण असून दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
मोर्चात सौरभ कावळे, रवी बनकर, मयूर झाडे, सूरज पेद्दुलवार, राहुल ताकधट, सचिन बल्की, गणेश नक्शीने, जीव वैद्य, ललित होकम, वैभव मंगरुडे, प्रविण गिरडकर, रमाकांत ठाकरे, गौरव, होकम, आकाश सातपुते, शुभम दयालवार, यांचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)
कुलगुरुंना दिले मागण्यांचे निवेदन
विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन कुलगुरु डॉ. कल्याणकर यांना सादर करण्यात आले. यावेळी डॉ. कल्याणकर यांनी मागण्यांवर गंभीरपणे विचार करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.