अपहाराने ग्रासल्या नळ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2016 01:39 AM2016-01-15T01:39:34+5:302016-01-15T01:39:34+5:30

गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषद मार्फत गावागावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या.

Emancipation program | अपहाराने ग्रासल्या नळ योजना

अपहाराने ग्रासल्या नळ योजना

Next

२७ योजनांच्या तक्रारी : पाणी पुरवठा समितींच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध एफआयआर
चंद्रपूर : गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषद मार्फत गावागावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या. या योजनांच्या देखभालीसाठी गावातच पाणी पुरवठा समित्या गठीत करण्यात आले. मात्र या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले पोट भरण्यासाठी पाणी पुरवठा योजनांची पुरती वाट लावली आहे. जिल्ह्यातील २७ पाणी पुरवठा योजनांच्या विविध तक्रारी जिल्हा परिषदेला आल्या. तक्रारींची दखल घेत अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. यात चार योजनांत आर्थिक अफरातफर आढळल्याने पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांविरूद्ध पोलिसांत एफआयआर नोंदविण्यात आली आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषदेमार्फत गावागावात पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. या योजनेद्वारे गावकऱ्यांची तहाण भागत आहे. योजनेमध्ये कोणत्याही समस्या उद्भवल्यास त्या दूर करण्यासाठी पाणी पुरवठा समिती गावात गठीत करून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र पदाधिकाऱ्यांनी नळ योजनेत विविध समस्या दाखवून मोठा गैरव्यवहार केला आहे. विशेष म्हणजे या नळ योजना सन २००५ नंतर सुरू झाल्या आहेत. या अनेक नळ योजनांना दहा वर्षही झालेली नाही.
पाणी पुरवठा योजनेच्या देखभालीसाठी जिल्हा परिषदेकडून ४० ते ४२ हजार रुपयाचा निधी प्रत्येक समित्यांना दिला जात आहे. मात्र समिती पदाधिकाऱ्यांनी या निधीचा दुरूपयोग करून स्वत:चेच पोट भरण्याचे काम केल्याने योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या. या कामाची चौकशी करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)

येथील सदस्यांवर गुन्हे दाखल
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केलेल्या प्रकरणात चार समिती पदाधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. यात गोंडपिपरी तालुक्याचे वडकुली, करंजी, नागभीड तालुक्यातील नवखडा व जिवती तालुक्यातील परमडोली येथील पाणी पुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या समितींच्या तक्रारी

आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी २७ गावातील नागरिकांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे. यात करंजी, वडकुली, दाताळा, नवखळा, अंतरगाव, जानाळा, गांगलवाडी, परमडोली, सुमठाना, मरकागोंदी, कोठोडा, पाटण, मरकमेठा, पाटीगुडा, नंदप्पा, भुरी-येसापूर, टाटाकवडा, नागापूर, आंबेनेरी, साखरा, मजरा (रै), आठमुर्डी, येरखेडा व चिमूर तालुक्यातील जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत केलेल्या कामाच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहे.

Web Title: Emancipation program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.