शिक्षण विभागाच्या कारभारावर आमदार नाराज
By admin | Published: May 9, 2017 12:39 AM2017-05-09T00:39:38+5:302017-05-09T00:39:38+5:30
शिक्षण विभागातील विविध प्रश्नांवर आयोजित सहविचार सभेत आमदारांसमक्ष शिक्षणाधिकाऱ्यांनी कर्मचारी ऐकत नसल्याची तक्रार मांडली.
सहविचार सभा : खासगी शिक्षकांची शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षण विभागातील विविध प्रश्नांवर आयोजित सहविचार सभेत आमदारांसमक्ष शिक्षणाधिकाऱ्यांनी कर्मचारी ऐकत नसल्याची तक्रार मांडली. त्यावर आ. नागो गाणार यांनी शिक्षण विभागातील कारभारावर नाराजी व्यक्त केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक, कनिष्ठ माध्यमिक, प्राथमिक व जिप शाळाच्या शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या उपस्थितीत शिक्षणविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत जिल्ह्यातील शाळातील कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारण सहविचार सभा नुकतीच जि.प. सभागृहात झाली.
या तक्रार निवारण सभेत विविध शाळातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व त्यांचे प्रलंबित वेतन, २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ च्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या, दुय्यम सेवा पुस्तिका, सेवानिवृत्तीचे प्रलंबित प्रकरणे, अनेक प्रलंबित प्रकरणातील वेळकाढू धोरण, प्लानमधील शाळांचे वेतन या व अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या सहविचार सभेला नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार, नागपूर ग्रामीणचे मराशिपचे अध्यक्ष सुभाष गोतमारे, संघटक मेहेरे आदी उपस्थित होते. नागपूर विभागाचे उपाध्यक्ष श्रीरामवार, प्रसिद्धी प्रमुख हरिश्चंद्र पाल, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, कार्यवाह रामदास गिरटकर, कोषाध्यक्ष गजानन शेळके, उपाध्यक्ष विलास खोंड, नरेंद्र राऊत, कनिष्ठ महाविद्यालय कार्यवाह विलास वरभे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख संध्या गिरटकर, चंद्रपूर शहराध्यक्ष दिवाकर पुद्दटवार, जि.प. शाळांचे मराशिप जिल्हाध्यक्ष नरेंद्र बोबडे, कार्यवाह संजय लोडे, खाजगी प्राथमिक जिल्हाध्यक्ष सरिता सोनकुसरे, कार्यवाही विकास नंदूरकर, विविध तालुक्याचे अध्यक्ष व कार्यवाह तसेच शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक व प्राथमिक) संजय डोर्लीकर, उपशिक्षणाधिकारी रहांगडाले, वेतन पथक अधीक्षक गादेवार, जेवूलकर, शिक्षण विभाग अधीक्षक दोडके व मुधोळकर, प्रकाश महाकाळकर यांनी चर्चेत भाग घेतला. या सहविचार सभेच्या निमित्ताने अनेक तक्रारी लवकरच निकाली काढण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्य केले.
या सहविचार सभेच्या निमित्ताने शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराचे दर्शन आमदार गाणारा यांच्यासह उपस्थित मराशिपच्या पदाधिकाऱ्यांना झाले. शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रत्येक कामाकरिता पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रार आमदार गाणार यांच्या समक्ष केली. तर कार्यालयात पाच अधिकारी उपलब्ध असूनही सहकार्य करीत नसल्याची खंत शिक्षणाधिकाऱ्यांनी आमदार महोदयापुढे व्यक्त केली. त्यामुळे शिक्षण विभागातील या कारभारावर शिक्षक आमदारांनी तीव्र नापसंती व्यक केली.
या सहविचार सभेच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर नसलेला वचन, निर्णय क्षमतेचा अभाव, कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त होणारी अगगिकता, कार्यालयीन कामकाजात असलेला शिस्तीचा अभाव, भ्रष्टाचाराची बजबजपुरी, शिक्षक आमदार गाणार यांच्यासह उपस्थितांच्या नजरेत आली. इतकेच नव्हे तर अनेक वर्षापासून प्रलंबीत प्रकरणाच्या अनेक फाईल्स कार्यालयातून गहाळ असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
एकंदरीत शिक्षणविभागाचा कारभार व शिक्षणाधिकारी म्हणजे अंधेरी नगरीचा चौकट राजा असल्याचा प्रत्यय या निमित्ताने लक्षात आला असल्याची माहिती हरिश्चंद्र पाल यांनी दिली आहे.
हक्कभंग दाखल करणार
राजोली येथील नवभारत विद्यालय राजोली एक शिक्षक निवृत्त होऊन मृत्यूही पावले. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षण विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु शिक्षण विभागाचे त्यांच्या पत्रांना केराची टोपली दाखविल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात विधानसभेत हक्कभंग दाखल करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. या प्रकरणाने दुखी होवून चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रलंबित समस्यावर कार्यवाही न करता अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना यमसदनी पाठविणारे यमदूत असल्याची प्रतिक्रिया सुभाष गोतमारे यांनी व्यक्त केली.