महानिर्मितीद्वारे राखेची उपयोगिता वाढविण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:14+5:302021-07-12T04:18:14+5:30
चंद्रपूर : राखेचा महत्तम विनियोग, पर्यावरणपूरक, स्वस्त आणि सुरक्षित वापर करण्याकरिता रेल्वेद्वारे राख वहन करण्याचे महानिर्मितीने उचललेले पाऊल कौतुकास्पद ...
चंद्रपूर : राखेचा महत्तम विनियोग, पर्यावरणपूरक, स्वस्त आणि सुरक्षित वापर करण्याकरिता रेल्वेद्वारे राख वहन करण्याचे महानिर्मितीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. आगामी काळात राखेचे महत्त्व वाढून आर्थिक स्रोत निर्माण होणार आणि इतर उद्योगांनासुद्धा उभारी मिळेल, असे मत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील राखेने भरलेल्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवताना ते बोलत होते. यावेळी सुमारे ५९ वॅगनमध्ये ४ हजार २०० मेट्रिक टन राख रेल्वेद्वारे रवाना करण्यात आली.
कार्यक्रमाला खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आभासी पद्धतीने महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक (प्रकल्प) व्ही. थंगापांडीयन, संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे तर चंद्रपूर येथून महानिर्मितीचे संचालक (खणिकर्म) पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) डॉ. नितीन वाघ, मुख्य अभियंता पंकज सपाटे, ॲशटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संजय मानधनिया, मध्य रेल्वेचे के. एन. सिंग, अंबुजा सिमेंट कंपनीचे मुख्य वितरण अधिकारी नीरज बंसल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. राऊत म्हणाले, या प्रयोगाचे यशापयश बघून महानिर्मितीच्या कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामधूनही रेल्वेद्वारे राखेची वाहतूक करण्याचे नियोजन आहे. रेल्वेद्वारे एकावेळी मोठ्या प्रमाणात राख वाहून नेता येते. शिवाय रेल्वेद्वारे राख वहन केल्यास अवजड वाहनांमुळे होणारे अपघात आणि वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
मानवासाठी विद्युत ही अत्यावश्यक बाब आहे. विजेची आवश्यकता लक्षात घेता विजेचे दर कसे कमी करता येईल, याबाबत नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. येथील औष्णिक विद्युत केंद्रामुळे झालेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच सकारात्मक पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार धानोरकर यांच्यासह, महनिर्मितीचे सीएमडी संजय खंदारे यांनीही मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक पुरुषोत्तम जाधव, संचालन सविता फुलझेले यांनी केले. याप्रसंगी उपमुख्य अभियंते राजेश राजगडकर, किशोर राऊत, राजेशकुमार ओसवाल, मदन अहिरकर तसेच अधीक्षक अभियंते सुहास जाधव, भास्कर इंगळे, अनिल गंधे, अनिल पुनसे, विजया बोरकर, पुरुषोत्तम उपासे, सुनील कुळकर्णी, मिलिंद रामटेके, महेश गौरी, प्रभारी आर.के. पुरी, सराफ, महेश राजूरकर तसेच वीज केंद्र, प्रकल्प, स्थापत्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.