जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी समस्या ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:13 PM2019-03-05T22:13:42+5:302019-03-05T22:14:46+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत असणाऱ्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेत रूजु करण्यात आले. परंतु त्यांना अद्याप स्थायी करण्यात आले नाही. सार्वजनिक विभाग अंतर्गत येणारे हे कर्मचारी सेवा देऊनही त्यांना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात सामावून घेतले नाही. त्यामुळे मागील एक वर्षापासून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. दरम्यान, समायोजन न केल्याने बुधवारपासून दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा कर्मचाºयांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत असणाऱ्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेत रूजु करण्यात आले. परंतु त्यांना अद्याप स्थायी करण्यात आले नाही. सार्वजनिक विभाग अंतर्गत येणारे हे कर्मचारी सेवा देऊनही त्यांना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात सामावून घेतले नाही. त्यामुळे मागील एक वर्षापासून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. दरम्यान, समायोजन न केल्याने बुधवारपासून दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. मात्र, या महाविद्यालयाकरिता कर्मचाऱ्यांचा नवीन आकृतीबंद तयार करून भरती करण्यात आली नाही. सवंर्गनिहाय पदांना मान्यता देऊन स्वतंत्र आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. परंतु, राज्यशासनाने मागणीची दखल न घेता जिल्हा सामान्य रूग्णालयातील स्थायी कर्मचाºयांना वैद्यकीय महाविद्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली.
राज्य शासनाच्या वैद्यकीय आरोग्य शिक्षण विभागात वेतन मान्यतेसह सामावून घेतले नाही. वैद्यकीय महाविद्यालय हा विभाग राज्याच्या वैद्यकीय व उच्च शिक्ष मंत्रालय अंर्तगत आणि जिल्हा सामान्य रूग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कक्षेत येतो. या दोनही शिखर संस्थामध्ये विविध संवर्गातील पदे रिक्त आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाला स्वतंत्र कर्मचारी आकृतीबंद तयार करून नियुक्ती करणे गरजे होते. परंतु जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचाºयांकडूनच वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज चालविले जात आहे, असा आरोप कर्मचारी कृती संघटनेने केला आहे.
रूग्णसेवेवर परिणाम होणार नाही -डॉ. मोरे
जिल्हा सामान्य रूग्णालयातील स्थायी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी दैनदिन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निवेदनातून इशारा दिला. या आंदोलनादरम्यान रूग्णालयातील दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये, याकरिता पर्यायी व्यवस्था करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयातील ५० विद्यार्थी, कंत्राटी २० व अन्य ३० कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा देण्यास बोलाविण्यात आले. यामुळे उपचारावर कोणताही अनिष्ठ परिणाम होणार नाही, असा दावा वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी केला.