पगारवाढीमुळे कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच ‘दिवाळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:55+5:302021-09-18T04:30:55+5:30
बल्लारपूर : येथील बल्लारपूर पेपर मिल कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली असून प्रतिमहा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रत्येकी किमान ३९७२ ...
बल्लारपूर : येथील बल्लारपूर पेपर मिल कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली असून प्रतिमहा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रत्येकी किमान ३९७२ रुपये, तर कमाल ५०८० एवढी घसघशीत वाढ आहे. यासोबतच कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना व्यवस्थापनाकडून विविध सवलती दिल्या जाणार आहेत.
पेपर मिल कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रत्येक तीन वर्षांनी एकदा वाढ (ग्रेडेशन) होत असते. त्याप्रमाणे पुढील तीन वर्षांकरिता व्यवस्थापन आणि पेपर मिल मजदूर सभा यांच्या चर्चेतून ही पगार वाढ करण्यात आहे. पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व्यवस्थापनाकडून सीओओ नीरज अग्रवाल, युनिट हेड उदय कुकडे, उपाध्यक्ष रणजी अब्राहम, जी. एम. एच. आर. प्रवीण शेखर, डीजीएम अजय दुरुगकर, तर मजदूर सभेकडून महासचिव वसंत मांढरे, उपाध्यक्ष तारासिंग कलसी, तसेच रामदास वागदरकर, वीरेंद्र आर्य, सुभाष माथनकर, अनिल तुंगीडवार, गजानन दिवसे, आशिष मेहता, के. व्ही. रेड्डी, राजेंद्र शुक्ला, सुदर्शन पुल्ली यांनी चर्चेत भाग घेतला होता. त्या कराराप्रमाणे स्थायी ७८८ कर्मचाऱ्यांना किमान ३९७२ व कमाल ५०८० वाढ झाली आहे. डेलीपेड १०२ कामगारांना व कंत्राटी कामगारांना प्रतिदिन ४५.५ रुपये, दुसऱ्या वर्षी ४७.५ रुपये व तिसऱ्या वर्षी ५० रुपये अशी वाढ मिळणार आहे. ही वाढ १ जुलै २०२० पासून लागू होत असून थकीत एकूण १० कोटी ४३ लाख ४६ हजार रुपये कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. सर्वत्र उद्योगाला मरगळ बसली असून ते आर्थिक संकटातून जात असताना पेपरमधील कर्मचाऱ्यांची त्रिवार्षिक पगारवाढ उल्लेखनीय म्हणावु लागेल. यामुळे कर्मचारीवर्ग सुखावला आहे.