कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण
By Admin | Published: August 20, 2014 11:25 PM2014-08-20T23:25:43+5:302014-08-20T23:25:43+5:30
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रूजू करून घ्यावे, या मागणीसाठी आयटक या संघटनेच्या वतीने येथील पंचायत समितीसमोर साखळी उपोषण करण्यात आले आहे.
नागभीड : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रूजू करून घ्यावे, या मागणीसाठी आयटक या संघटनेच्या वतीने येथील पंचायत समितीसमोर साखळी उपोषण करण्यात आले आहे. या आंदोलनात जवळपास १०० महिला सहभागी झाल्यात.
कोणतीही पूर्वसूचना न देता या तालुक्यातील जवळपास २४ स्त्री-पुरुषांना त्या-त्या गावच्या समित्यांनी कामावरून कमी केले. हा त्या स्त्री-पुरुषांवर अन्याय आहे. या स्त्री-पुरुषांना कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी आयटकने आजपर्यंत विविध आंदोलने केली. या आंदोलनाचे फलित म्हणून या स्त्री-पुरुषांना कामावर रूजू करून घेण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. पण काही केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती टाळाटाळ करीत आहेत. ही टाळाटाळ करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. तसेच कामावरून कमी करण्यात आलेल्या स्त्री-पुरुषांना पूर्ववत रूजू करून घ्यावे, या मागणीसाठी आयटकचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे व तालुका अध्यक्ष राजू निकुरे यांच्या नेतृत्वात हे साखळी उपोषण करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)