पोंभुर्णा तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा

By admin | Published: January 15, 2015 10:49 PM2015-01-15T22:49:27+5:302015-01-15T22:49:27+5:30

महसूल प्रशासनात तहसील कार्यालयाला अनन्यसाधारण महत्व आहे. तालुक्याच्या महसूल यंत्रणेत तहसीलदार आहेत. मात्र नायब तहसीलदार, लिपीक, शिपाई या सेवा संलग्नीत १० पदे रिक्त

Employees scarcity in Pombhurna tehsil office | पोंभुर्णा तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा

पोंभुर्णा तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा

Next

पोंभुर्णा : महसूल प्रशासनात तहसील कार्यालयाला अनन्यसाधारण महत्व आहे. तालुक्याच्या महसूल यंत्रणेत तहसीलदार आहेत. मात्र नायब तहसीलदार, लिपीक, शिपाई या सेवा संलग्नीत १० पदे रिक्त असल्यामुळे येथील कार्यरत तहसीलदारांवर कामाचा ताण पडत आहे. परिणामी सामान्य नागरिकांचे कामे प्रभावित होत आहेत. जिल्हा प्रशासनाने पोंभुर्णा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा तुटवडा दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोंभुर्णा तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्यासह नायब तहसीलदार तीन, लिपीक चार, अपर कारकून चार, शिपाई चार यांच्यासह एकुण ४२ पदांना मंजुरी आहे. मात्र आजमितीला या ठिकाणी ३२ कर्मचारी कार्यरत असुन दहा पदे रिक्त आहे. परिणामी येथील कार्यरत तहसीलदार राजेश सरवदे यांना प्रशासनाचा कारभार चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नायब तहसीलदार दागमवार व पानपत्तुलवार हे सेवानिवृत्त झाल्यामुळे आजतागायत त्यांचे रिक्त झालेले पद भरण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित कामावरील ताणसुद्धा कार्यरत कर्मचाऱ्यांवर पडत आहे.
तालुका महसूल प्रशासनाला जमिन मालकीची नोंद करणे, शेतीशी संबंधीत कर गोळा करणे, शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणे, आपतकालिन योजना राबविणे, जमिन कायद्याची अंमलबजावणी करणे, शासकीय मालमत्तेवर देखरेख ठेवणे, मुद्रांक शुल्क कायद्याची अंमलबजावणी करणे, निवडणूक संदर्भातील कामे पार पाडणे, पिकांची आणेवारी ठरविणे आदी कामे करावी लागतात. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी व उपविभागीय स्तरावरील कामकाज करणे, असा कामाचा डोलारा सांभाळावा लागतो. यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असताना येथील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकाच्या कामाचा खोळंबा होत आहे. कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
जिल्हा प्रशासनाने सामान्य जनतेच्या हितासाठी व येथील प्रभावित होणाऱ्या कामांना गतिमान करण्यासाठी रिक्त असलेल्या पदाचा भरणा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Employees scarcity in Pombhurna tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.