अनियमित वेतनामुळे कर्मचारी वैतागले

By admin | Published: October 3, 2015 12:47 AM2015-10-03T00:47:55+5:302015-10-03T00:47:55+5:30

सध्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी व अनागोंदी कारभारामुळे जिल्हा परिषद कर्मचारी चांगलेच त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.

Employees wager due to irregular salary | अनियमित वेतनामुळे कर्मचारी वैतागले

अनियमित वेतनामुळे कर्मचारी वैतागले

Next

दिवाळी अंधारात जाण्याची भीती : जिल्हा परिषद प्रशासनाचा अनागोंदी कारभार
चंद्रपूर : सध्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी व अनागोंदी कारभारामुळे जिल्हा परिषद कर्मचारी चांगलेच त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. अनियमित वेतनामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जटील झाला आहे. दोन-दोन महिने वेतन प्रलंबित ठेवले जाते, असे कर्मचाऱ्यांचेच म्हणणे आहे. तोंडावर दिवाळी असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाचा कारभार सुधारल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आपली दिवाळी अंधारात जाणार की काय, अशी भीती कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
महिनाभर काबाडकष्ट करून मिळणाऱ्या वेतनातून कर्मचाऱ्यांना आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह, विमा भत्ते, कर्जाची परतफेड, मुलांच्या शिक्षणाचे शुल्क, कुुटुंबातील सदस्यांचा औषधोपचार आदी कामे करावी लागतात. वेतनामध्ये अनियमिता आली की कर्मचाऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण होते. त्यांचे मासिक नियोजनच कोलमडते. पूर्वी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ५ तारखेला नियमित व्हायचे. मात्र जून महिन्यापासून वेतन अदा करण्यात अनियमितता आली असून दोन-दोन महिने वेतन प्रलंबित ठेवले जात आहे. मुख्य कार्यपालन अधिकारी आणि मुख्य लेखा वित्त अधिकारी रुजू झाल्यापासून हा प्रकार घडत असल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे म्हणणे आहे. सणासुदीच्या दिवसातच कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित ठेवल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अजूनही जून महिन्यापासून वेतन नाही. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे माहे जुलै, आॅगस्टपासून वेतन नाही. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांना औषधोपचार, पाल्यांच्या शिक्षणाकरिता भरावी लागणारी महिन्याची फी कुठून द्यावी, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. एकूणच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर वेतनाअभावी उपासमारीची पाळी आली आहे. दिवाळी समोर असताना अशा प्रकारे अनियमितरित्या कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आल्यास कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती खुद्द कर्मचारीच व्यक्त करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

वेतनाअभावीच ए.एन.एम.चा मृत्यू
प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती उपकेंद्र परमडोली येथील ए.एन.एम. अनिता देठे या कर्करोगाने आजारी होत्या.
मे २०१५ पासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर औषधोपचार होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश सुरमवार यांनी केला आहे. त्यांच्या अंत्यविधीकरिताही कुटुंबियांकडे पैसे उपलब्ध नव्हते. सर्व कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून अंत्यविधी केल्याची माहिती संघटनेचे सुरमवार यांनी दिली.

आयुक्तांकडे तक्रार
जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळेच कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित राहत असल्याचा आरोप कर्मचारी महासंघाने केला असून याबाबत विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे संघाने तक्रारही केली आहे.

Web Title: Employees wager due to irregular salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.