कर्मचाऱ्याच्या कामाची घडी विस्कटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:26 AM2021-03-28T04:26:11+5:302021-03-28T04:26:11+5:30
सिंदेवाही : पंचायत समिती कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या कामाची घडी विस्कटली असून याचा कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे लेटलतीफ ...
सिंदेवाही : पंचायत समिती कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या कामाची घडी विस्कटली असून याचा कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
या कार्यालयात जाऊन बघितले असता कार्यालयाच्या नियोजित वेळीदेखील या कार्यालयातील काही विभागांचे कुलूप उघडले गेले नव्हते. तर, काही विभागांचे दरवाजे उघडे असले, तरीही सकाळी १० वाजता बोटांवर मोजण्याइतपतच कर्मचारी हजर होते. काही कर्मचारी समोरच्या पानटपरीवर गप्पा मारण्यात व्यस्त होते. कार्यरत असणारे बहुसंख्य कर्मचारी ब्रह्मपुरी व चंद्रपूर येथून येजा करतात. सकाळी १० वाजता कार्यालयात फेरफटका मारला असता अनेक कार्यालये रिकाम्या स्वरूपात आढळले. या कार्यालयांत अनेक नागरिक विविध कामांसाठी येतात. मात्र, कार्यालयात कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित राहत नसल्याने अनेकांना आल्यापावली परत जावे लागत असल्याने नागरिकांना याचा मनस्ताप होतो. पंचायत समिती कार्यालयात काहीच कर्मचारी वेळेवर येत असून काही कर्मचाऱ्यांना सवलत तर नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. पंचायत समितीचा बांधकाम विभाग नेहमीच खाली असतो. शिवाय, अभियंता दौऱ्यावर गेलेत, असे सांगण्यात येते.