फॉरेस्ट औद्योगिक विकास केंद्रातून देणार रोजगाराला चालना - सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 03:34 PM2023-02-24T15:34:52+5:302023-02-24T15:37:41+5:30
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा २८ वा स्थापना दिन
चंद्रपूर : ताडोबा हे भारतातील समृद्ध असे जंगल आहे. याचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे. स्थानिक गावकरी, वनविभाग आणि सर्वांनी मिळून हा दर्जा प्राप्त करून दिला. यापुढे जिल्ह्यात फॉरेस्ट औद्योगिक विकास केंद्राची निर्मिती करून वनक्षेत्रातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहातील सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, वन विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, लेफ्टनंट कमांडर देवाशिष जैना, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू व मान्यवर उपस्थित होते.
मुनगंटीवार यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रकल्पाच्या विकासासाठी सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण योजनांवर सविस्तर प्रकाश टाकला. खासदार धानोरकर व आमदार जोरगेवार यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाप्रसंगी वनक्षेत्रालगत गावातील वर्ग १० व १२ वीमधील ३५ गुणवंत विद्यार्थ्यांना टॅबलेट व लॅपटॉप भेट देऊन कौतुक केले. गरजू व शिष्यवृत्ती प्राप्त २६ मुलींना सायकल भेट देण्यात आली. ५ उत्कृष्ट निसर्ग मार्गदर्शकांना सन्मानचिन्ह व दुर्बीण प्रदान केली. स्थानिक लोकांनी पर्यटकांसाठी सुरू केलेल्या ४५ होम स्टेपैकी उत्कृष्ट २ होम स्टेनासुद्धा सन्मानचिन्ह देऊन प्रोत्साहित केले. प्रास्ताविक ताडोबाचे क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रज्ञा नंदराज यांनी केले. आयोजनासाठी उपसंचालक (कोर), नंदकिशोर काळे, उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक, सहायक वन संरक्षक बापूजी येळे, महेश खोरे, सर्व वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
धनादेश वितरण
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रालगत असलेल्या ९५ ग्राम परिस्थितीकी विकास समितींचा सत्कार आणि पर्यटन महसुलातील भागातील गावांना प्रत्येकी ३.५० लाखांचा धनादेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याशिवाय व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील ४० प्राथमिक कृती दलांपैकी पाच उत्कृष्ट कृती दलांना सन्मानचिन्ह व २५ हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला.