रोजगार हमीतून ५२ हजार मजुरांना काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:55 AM2018-04-18T00:55:37+5:302018-04-18T00:55:37+5:30
मंगेश भांडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: गतवर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीत वाढ झाली. ग्रामिणांचे कामाच्या शोधात स्थलांतर होत आहेत. अशातच आर्थिक अडचणींमुळे मिळेल ते काम करण्यास मजुरांची धावपळ सुरू असताना ग्रामपंचायत स्तरावरील रोहयो कामांमुळे मजुरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मजुरांच्या मागणीवरून प्रशासनाने जिल्ह्यातील ३८० ग्रामपंचायतीमध्ये सध्या १ हजार २१० कामे सुरु केले आहेत. यामुळे तब्बल ५२ हजार ७५४ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
गतवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस पडला. त्यामुळे अनेकांना निम्मे उत्पन्न झाले. परिणामी यावर्षी अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी अनेक नागरिक कामाच्या शोधात आहेत. कमी पावसाने शेती पडीक राहिली. परिणामी शेतीचे कामे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे कामाच्या शोधात अनेकांवर गाव सोडून जाण्याची पाळी आली आहे. काही मजूरांनी परप्रांतात जावून सोयाबीन, कापूस वेचणीची कामे केली. यातून त्यांना ५ ते १० हजार रूपये मिळाले. मात्र सद्या उन्हाळा सुरू असल्याने शेतीची कामेही संपली आहेत. परिणामी कामाच्या शोधात मजुरांची भटकंती होत आहे.
शासनाच्या योजनेनुसार मजुरांनी ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी केली. या मागणीवरून जिल्हा प्रशासनाने मजुरांना गावातच विविध कामे उपलब्ध करून दिले आहेत. रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायतस्तरावर पांदण रस्ता, रस्ता बांधकाम, नाला खोलीकरण, तलाव खोलीकरण, बोडी खोलीकरण, गाळ काढणे, मजगी, शेततळे, आदी कामे सुरू केले आहेत. त्यामुळे ५२ हजार ७५४ मजुरांना काम मिळाले आहे.
कोरपना, भद्रावती तालुक्यातील मजुरांना कामांची प्रतीक्षाच
मजुरांना आधार देण्यासाठी अनेक तालुक्यांमध्ये रोहयोची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र कोरपना व भद्रावती तालुक्यात अद्याप एकाही ग्रामपंचायतस्तरावर रोहयोचा कामांचा शुभारंभ झालेला नाही. त्यामुळे मजुरांना कामांची प्रतीक्षा आहे. तर चिमूर तालुक्यात सर्वाधिक १७८ कामे सुरू असून त्यापाठोपाठ सिंदेवाही तालुक्यात १५९ व ब्रम्हपुरी तालुक्यात १४४ कामे सुरू आहेत. त्यामुळे मजुरांना दिलासा मिळाला आहे.
एक हजार २१० कामे सुरू
जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत १ हजार २१० कामे सुरू आहेत. यात पांदण रस्त्याचे ९१ कामे सुरू असून या कामांवर १६ हजार ५६ मजूर काम करीत आहेत. तर सिमेंट क्रॉक्रीट रस्त्याच्या ६ कामांवर ७२, नाला खोलीकरणाच्या ४२ कामांवर १४ हजार १२७, तलाव खोलीकरणाच्या ३४ कामांवर ६ हजार ५६९, बोडी खोलीकरणाच्या २९ कामांवर १० हजार ५१२, बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या ४ कामांवर १०५, मजगीच्या ३१ कामांवर १ हजार ३५६, शेततळ्याच्या १ कामावर २३, घरकूल बांधकामाच्या ६२१ कामावर २ हजार ३९, वृक्षारोपणाच्या १५० कामावर ३५६, शौचालय बांधकामाच्या ६५ कामांवर २२४, शोषखड्डयाच्या ४ कामांवर ४, सिंचन विहीरीच्या १०२ कामावर १ हजार २१४ तर नॅडेपच्या ७ कामांवर ११ मजूर अशा १ हजार २१० कामांवर ५२ हजार ७५४ मजुर काम करीत आहेत.