दारूच्या रिकाम्या बाटल्यांमुळे भद्रावतीच्या नाल्या तुंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:32 AM2021-03-01T04:32:25+5:302021-03-01T04:32:25+5:30
भद्रावती : नगर परिषद सफाई कामगारांना रविवारी नालेसफाईचे काम चालू असताना शहरातील टप्प्यावरील नालीमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा जवळपास ...
भद्रावती
: नगर परिषद सफाई कामगारांना रविवारी नालेसफाईचे काम चालू असताना शहरातील टप्प्यावरील नालीमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा जवळपास सात ते आठ ठिकाणी खच पडून असल्याचे आढळून आले. एका ठिकाणी जवळपास ५०० ते ६०० बाटल्या होत्या. दारूच्या रिकाम्या बाटल्यांमुळे नाल्या तुंबल्या असून सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे सफाई कामगारांचे म्हणणे आहे.
दर महिन्याला नालेसफाईचे काम केले जाते. प्रत्येक महिन्याला मुख्यत्वेकरून टप्पा परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून येतात.
दारूबंदी असलेल्या जिल्ह्याच्या एका गावातील एका भागात जर ही अवस्था असेल, तर संपूर्ण जिल्ह्यात काय अवस्था असेल, याचा विचार न केलेलाच बरा.
भद्रावती ते चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या आयुध निर्माणीच्या भिंतीपाशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचे असेच खच पडून राहतात.
दारूच्या रिकाम्या बाटल्यांमुळे नाल्या बुजल्या गेल्याने सांडपाणी वाहू शकत नाही. दारूच्या बाटल्यांमुळे पावसाळ्यात शहरी भागात पंचशीलनगर, घुटकाळा येथील नागरिकांच्या घरात पाणी घुसण्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकारावर निर्बंध घालणे जरुरी आहे, असे पाणीपुरवठा सभापती चंद्रकांत खारकर यांचे म्हणणे आहे.