माना कॉलरीचे पाणी वर्धा नदीत सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 11:20 PM2018-05-09T23:20:00+5:302018-05-09T23:20:00+5:30
यंदा पाऊस कमी झाल्याने वर्धा नदीत पुरेसे पाणी जमा झाले नाही. याचा फटका या उन्हाळ्यात बसणे सुरू झाले आहे. पाणी वापरावर मर्यादा आली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे आता शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
वसंत खेडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : यंदा पाऊस कमी झाल्याने वर्धा नदीत पुरेसे पाणी जमा झाले नाही. याचा फटका या उन्हाळ्यात बसणे सुरू झाले आहे. पाणी वापरावर मर्यादा आली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे आता शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पुढे पाण्याची तीव्र टंचाई भासू नये, याकरिता मजिप्रा, नगर परिषद प्रशासन, बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापन यांनी एकत्रित येऊन युद्धपातळीवर उपाययोजनावर काम सुरू केले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बल्लारपूर शहरात प्रतिदिन १० एमएलडी एवढा पाणी पुरवठा होत असते. ही उचल वर्धा नदीवरून होते. याच नदीवर राजुरा, पेपर मिल यांच्या विहिरी असून पेपरमिल तर रोज ४७ एमएलडी एवढे पाणी उचलते. या तीनही विभागांनी नदीवर बंधारे बांधले आहेत.
नोव्हेंबर महिन्यापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागल्यामुळे मजिप्राने जुना बंधारा अधिक उंच आणि मजबुतीकरिता नगर परिषदेचे अर्थसहाय्य घेतले. तरीही पाण्याची पातळी समाधानकारक नाही. पुढे पाण्याची भीषण टंचाई होऊ नये, याकरिता उपाय योजनाबाबत न. प., जीवन प्राधिकरण, पेपरमिल, तहसील कार्यालय यांची तातडीची बैठक झाली. त्यात वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, मुख्याधिकारी विपीन मुदधा, जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता सुशील पाटील, तहसीलदार विकास अहीर, पेपर मिलचे काशीकर यांनी भाग घेऊन चर्चेअंती, चंद्रपूर जवळील माना कोळसा खाणीतून उसर्ग होणारे पाणी वर्धा नदीत आणण्याचे ठरले व याची सर्व जबाबदारी पेपरमिल व्यवस्थापनाने उचलली आहे. त्यानुसार माना खदानीत तीन पंप लावून इरई नदी वाटेने वर्धा नदीत पाणी येत आहे. एक दोन दिवसात आणखी दोन पंप लावले जाणार आहेत, अशी माहिती जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता सुशील पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे तूर्त पाणी टंचाईवर मात करता आली आहे. तरीही, रोजच्या कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पिभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाण्याची पातळी खालावून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते. तशा आणीबाणीप्रसंगी पेपरमिलचे पाणी प्राधिकरणाकडे वळविण्याकरिता आतापासूनच तयारी करून ठेवण्यात आली आहे. पाण्याच्या रोजच्या स्थितीकडे जीवन प्राधिकरणाकडून पाहणी केली जात आहे.
तोटी चोरांमुळे मौल्यवान पाणी वाया
सार्वजनिक नळाच्या तोट्या चोरीला जात असल्याने पाणी विनाकारण वाया जात आहे. यावर उपाय म्हणून नगर परिषदेने तोट्या पाईपला वेल्डिंग केल्या. त्यावर उपाय म्हणून चोरांनी पाईप कापून तोट्या चोरून नेल्या. त्यामुळे, परत पूर्वस्थिती आली. रोज कितीतरी पाणी वाया चालले आहे. नगर परिषद परत तोट्यांना वेल्डिंग करीत आहे. तोट्या बसविणे, चोरांनी चोरून नेणे व मौल्यवान पाणी वाया जाणे हे चक्र पूर्णत: कसे व कधी थांबणार. चोरांना पकडून कडक शिक्षा झाल्यशिवाय ते थांबणार नाही.
आठ हजार कनेक्शन
बल्लारपूर शहरात मजिप्राचे ८ हजार घरी नळ कनेक्शन, ३५० स्टँड पोस्ट (सार्वजनिक नळ) आहेत. जीवन प्राधिकरणाच्या पाण्यावर शहरातील सुमारे ६० हजार लोकांची तहान भागत आहे. रेल्वे कॉलनीलाही येथूनच पाणी दिले जाते.
पाणी एक दिवसाआड दिले जात असले तरी, ते साठवून ठेवल्यास दोन तीन दिवस सहज पुरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा केला जात आहे. एक दिवस वस्ती विभाग आणि एक दिवस टेकडी विभाग अशी विभागणी केली आहे.
- सुशील पाटील,
उपविभागीय अभियंता
नगर परिषदेच्या ५० विहिरी आहेत. ५१० हातपंप, बोअरिंग, ५२ इंधन विहीर (ट्यूब वेल) स्वच्छ केल्या आहेत. टँकरने पाणी पुरवठा करण्याची अजून स्थिती आली नाही. मात्र, वेळ आलीच तर तशी तयारी करून ठेवण्यात आली आहे.
- स्वप्नील पिदुरकर, अभियंता,
न. प. पाणी पुरवठा.