सर्वांगीण विकासाकरिता भावी पिढी सक्षम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:05 AM2018-01-01T00:05:42+5:302018-01-01T00:06:31+5:30
गावातील लहान मुले उद्याचे भावी नागरिक आहेत. त्यामुळे मुलांना सर्वांगाने सक्षम केल्यास गावाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : गावातील लहान मुले उद्याचे भावी नागरिक आहेत. त्यामुळे मुलांना सर्वांगाने सक्षम केल्यास गावाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. कोरपना तालुक्यातील पिपर्डा गावात आयोजित स्वच्छता महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
स्वच्छता महोत्सवाचे प्रास्ताविक कोरपना पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पार पडले. तर अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अॅड. संजय धोटे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते, सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली आदी उपस्थित होते.
पापळकर पुढे म्हणाले, मुलांचा विकास करावयाचा असेल, तर स्वच्छतेच्या सवयीसह कुपोषणमुक्त ग्राम होणे गरजेचे आहे. यासोबतच स्पर्धेच्या युगात गावातील तरुण समोर येण्यासाठी तरुणांना वाचणाची सवय लावली पाहिजे. वाईट व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. उज्वल जीवन घडविण्यासाठी लहान पणापासूनच चांगल्या सवयीचा स्विकार केला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच पिपर्डा गावातील शाश्वत स्वच्छता, गुडमार्निंग पथकासह गावात राबविलेल्या सर्व उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आ. संजय धोटे यांनी जीवनमान उंचावण्याकरिता सर्वांनी स्वच्छता राखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते म्हणाले, सकारात्मक दृष्टीने सर्वांनी विचार केल्यामुळेच आज गावात शाश्वत स्वच्छता निर्माण झाली आहे. पुढेही गावकऱ्यांनी असेच कार्य करावे.
यावेळी नायब तहसीलदार मडावी, कृषी अधिकारी देवनाडे, स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, पिपर्डा ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रभान मडावी, धानोली ग्रामपंचायतचे सरपंच विजय रणदिवे, विस्तार अधिकारी जिवन प्रधाण, प्रविण मस्के, खुशाल राठोड, नगरसेवक सोयल अली, रमेश मालेकर उपस्थित होते.
यावेळी गावात शाश्वत स्वच्छता राखणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा व गुडमार्निग पथकाच्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. संचालन व आभार सय्यद आबिद अली यांनी मानले.