विद्यार्थ्यांच्या संशोधकवृत्तीला चालना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:25 PM2018-01-15T23:25:47+5:302018-01-15T23:26:26+5:30
भारतामध्ये अनेक क्षेत्रात संशोधनाची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थी दशेतच संशोधनाची वृत्ती वाढीला लागणे आवश्यक आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : भारतामध्ये अनेक क्षेत्रात संशोधनाची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थी दशेतच संशोधनाची वृत्ती वाढीला लागणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेच्या स्तरावर जिल्हयात प्रयत्न होत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, राज्य विज्ञान संस्था, रवीनगर, नागपूर, चंद्रपूर जिल्हा परिषदचे शिक्षण विभाग आणि भवानजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शास्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम’ या विषायावर ४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०१७-१८ चा उदघाटन सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना श्यामकुळे तसेच भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष रामणिकलाल चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, कृषी-पशु संवर्धन सभापती अर्चना जीवतोडे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती व स्वागताध्यक्ष कृष्णा सहारे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार महेशकर, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य रोशनी अनवर खान, योगिता डबले, नितु चौधरी, रणजित सोयाम, रातीलाल चव्हाण आणि संस्थेचे सचिव केशवराव जेणेकर उपस्थ्ति होते.
ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून संशोधनाचे बीज पेरले जाते. शोधामुळे देशाचा आर्थिक विकास होतो आणि सन्मान वाढतो, प्रदर्शनाच्या माध्यमातून चिकित्सक बुध्दीला वाव मिळते, जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा वाढावा म्हणून मी सदैव पाठीशी राहील, असे अभिवचन त्यांनी दिले.
केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विज्ञानाचे महत्व विषद केले. आजच्या जगात वैज्ञानिकांची मागणी असून वैज्ञानिक तयार करण्यात शिक्षकांची महत्वांची भूमिका आहे. त्यानी विज्ञान मॉडेल्सची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्थेचे कार्याध्यक्ष रामणिकलाल चव्हाण यांनी प्रदर्शनाचे महत्व असून आम्हाला आयोजनाची संधी दिल्याबद्दल आभार मानले. सदर कार्यक्रमात ‘वृक्ष वाचवा’ ह्या विषयावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी केले.
प्रदर्शनात १९५ मॉडेल्स
या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील एकूण १९५ मॉडेल्स आहेत. यात प्राथमिक बिगर आदिवासी-४२, प्राथमिक आदिवासी-१८ प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य-१५ ,प्राथमिक शिक्षक लोकसंख्या शिक्षण-१५, तसेच माध्यमिक बिगर आदिवासी -४२ ,माध्यमिक आदिवासी १८, माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य १५, माध्यमिक लोकसंख्या शिक्षण १५ अशा विविध वैज्ञानिक प्रतिकृतींचा समावेश आहे.