अतिक्रमित जमिनी नियमानुकूल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:22 PM2018-04-29T23:22:31+5:302018-04-29T23:22:46+5:30
भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना देण्यात आलेल्या जमिनींच्या धारणाधिकाराचे सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करण्याच्या प्रक्रियेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सिंधी समाजबांधवांच्या वसाहतीमध्ये भरपाई संकोष मालमत्तेमधून दिलेल्या....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना देण्यात आलेल्या जमिनींच्या धारणाधिकाराचे सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करण्याच्या प्रक्रियेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सिंधी समाजबांधवांच्या वसाहतीमध्ये भरपाई संकोष मालमत्तेमधून दिलेल्या अथवा अशा मालमत्तेवरील अतिक्रमण नियमानुकुल करून वर्ग-ब सत्ता प्रकाराने असे भुखंड दिल्याचे आढळल्यास पुनर्विलोकन करून अशा निवासी मिळकतीला वर्ग-अ नमूद करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सिंधी समाज बांधवांच्या हिताचा सदर निर्णय घेतल्याबद्दल शनिवारी सिंधी समाज बांधवांच्या वतीने चंद्रपुरात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करीत आभार व्यक्त केले. तात्पुरत्या पट्टयावर दिलेल्या जमिनी मालकी हक्काने देणे तसेच त्यांना भाडे पट्टयाने दिलेल्या जमिनीसुध्दा मालकी हक्काने देणे या सिंधी समाज बांधवांच्या मागण्यांचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा केला आहे. विधानसभा सदस्य म्हणूनसुध्दा त्यांनी विधानसभागृहाच्या माध्यमातूृन या विषयाचा सतत पाठपुरावा केला आहे. ही प्रलंबित मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पुर्णत्वास आल्यामुळे सिंधी समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिंधी पंचायत चंद्रपूरचे अध्यक्ष वल्लीराम टहलियानी, सचिव मेघराजमल पबनानी, परमानंद दुधानी, मुरली मंगाणी, राजकुमार लेखवाणी आदींच्या शिष्टमंडळांने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला.