फुटपाथवर अतिक्रमण; महापालिका प्रशासन निद्रिस्त
By admin | Published: January 3, 2015 10:59 PM2015-01-03T22:59:00+5:302015-01-03T22:59:00+5:30
शहरातील रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांधण्यात आलेल्या फुटपाथवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले. त्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्याच्या काठावरून चालावे लागत आहे.
चंद्रपूर : शहरातील रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांधण्यात आलेल्या फुटपाथवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले. त्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्याच्या काठावरून चालावे लागत आहे. यातून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर विषयाकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. दुसरीकडे, पालिकेने या प्रकाराकडे गंभीरतेने लक्ष देऊन दोन दिवसांत अतिक्रमण हटविले नाही तर आम्हीच रस्त्यावर उतरून अतिक्रमण हटवू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
फुटपाथवरील अतिक्रमणाबाबत मनपाची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी शनिवारी पुन्हा मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांच्याशी वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी सायंकाळपर्यंत फोनच उचलला नाही. मुख्य मार्गावरून सुरक्षित चालता यावे, यासाठी शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर महानगर पालिकेच्यावतीने फुटपाथ तयार करण्यात आले. त्याला लोखंडी रेलिंगदेखील लावण्यात आले. मात्र काही दिवसांतच व्यापाऱ्यांनी या फुटपाथवर अतिक्रमण केले. फुटपाथवरच विक्रीचे साहित्य ठेवण्यात येत असल्याने नागरिकांना तेथून चालणे कठिण झाले आहे. एखाद्या सामान्य नागरिकाने यावर आक्षेप घेतल्यास संबंधित व्यापारी त्या नागरिकालाच धमकावतो. अशा अनेक घटना आजवर घडल्या आहेत. अतिक्रमणामुळे हे फुटपाथ अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्यामुळे फुटपाथवरून चालताना जेथे ते फुटले आहे, त्याला वळसा घालत रस्त्यावर व पुन्हा फुटपाथवर यावे लागते.
चंद्रपूर शहरातील नागरिक अशी कसरत दररोजच करीत आहेत. याची जाणिव असतानाही महानगर पालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. महानगर पालिकेत अतिक्रमण या विषयासाठी स्वतंत्र विभाग आहे. झोनल आॅफीसरदेखील नेमले आहेत. मात्र या अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांकडून ठराविक रकमेचे पाकीट दरमहा दिल्या जात असल्याने या अधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यावर पट्टया चढवून घेतल्या आहेत.
शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच, अनेक नागरिकांनी ‘लोकमत’च्या कार्यालयात दूरध्वनी करून आभार मानले. फुटपाथवर व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत संताप व्यक्त केला. महानगर पालिका जर या विरुद्ध कारवाई करीत नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही अनेकांनी दिला. एकूणच या विषयात आता मनपा काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)