वेकोलिचे मुख्य मार्गावर अतिक्रमण
By Admin | Published: June 25, 2014 12:23 AM2014-06-25T00:23:48+5:302014-06-25T00:23:48+5:30
वेकोलिच्या गोवरी व पोवनी खुल्या कोळसा खाण परिसरातून जाणाऱ्या राजुरा गोवरी- पोवनी मार्गावर पवनी नाल्याजवळ वेकोलिने आपल्या सोईनुसार मोठी नाली खोदून त्या नालीची माती रहदारीच्या हद्दीत टाकली.
सास्ती : वेकोलिच्या गोवरी व पोवनी खुल्या कोळसा खाण परिसरातून जाणाऱ्या राजुरा गोवरी- पोवनी मार्गावर पवनी नाल्याजवळ वेकोलिने आपल्या सोईनुसार मोठी नाली खोदून त्या नालीची माती रहदारीच्या हद्दीत टाकली. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्तत केला आहे.
पावसाळ्यात या नालीत व नाला परिसरात पाणी साचून दलदल निर्माण होऊन रस्ता पूर्णपणे खराब होतो. नाली खोदून रहदारी हद्दीत माती टाकल्यामुळे रस्त्यावर चिखल पसरुन वाहतुकीस अडचण निर्माण होणार आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षततेमुळे वेकोलिने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे.
राजुरा तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गोवरी व पोवनी खुल्या कोळसा खाण परिसरातून राजुरा- गोवरी- पोवनी - कवठाळा हा मुख्य मार्ग जातो. या मार्गाने वेकोलिची मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरु असते. त्यामुळे या रस्त्याची नेहमी दुरवस्था असते. याकडे वेकोलि व सार्वजजनिक बांधकाम विभागही पाहिजे तसे लक्ष देत नाही. त्यामुळे या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. दुरुस्तीच्या नावावर मात्र अनेकदा या रस्त्यावर काम सुरु असते. दुरुस्ती निकृष्ठ दर्जाची केली जात असल्यामुळे रस्त्या कधीच सुस्थितीत दिसून येत नाही.
वेकोलिने खाण परिसरातून वाहणारे नाले आपल्या सोयीनुसार वळविले. वळविलेल्या नाल्याचे पाणी खाणीत जाऊ नये, याकरिता पोवनी गावालगत असलेला नाल्याचे तसेच इतर पाणी गोवरी ते पोवनी दरम्यानच्या खोलगट भागात असलेल्या पुलाच्या दिशेने वाहून जाण्याकरिता या परिसरातून जाणाऱ्या राजुरा- गोवरी- पोवनी- कवठाळा या रस्त्याच्या अगदीच कडेला मोठी नाली खोदली. त्या नालीची माती याच रस्त्याच्या रहदारी हद्दीत टाकण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होऊन वाहतुकीस अडचण निर्माण होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरुन वेकोलिची मोठी वाहतूक होत असून रस्ते खराब होतात. त्यामुळे वेकोलि परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी वेकोलिने रस्त्यावरच अतिक्रमण करुन माती टाकून व नाली खोदून रस्ता खराब करीत आहे. याबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. (वार्ताहर)